Join us

‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमात रेणुका शहाणे दिसणार या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 5:19 PM

‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमाद्वारे ज्या बारा महिलांनी आपल्या पाककौशल्याचा वापर करून आपल्या कुटुंबियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला त्यांची ही प्रेरणादायक यशोगाथा या कार्यक्रमात उलगडून दाखविली जाणार आहे.

घरातल्या स्वयंपाकघरात गृहिणींनी बघितलेली स्वप्नं आता चक्क प्रत्यक्षात उतरणार आहेत. ज्या सुगरण महिलांनी आपल्या पाककौशल्याचा वापर आपल्या छोटेखानी उद्योग निर्मितीसाठी केला, अशा महिलांची गोष्ट ‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमात दाखवली जाणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ झी टीव्हीवर शनिवार 14 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 वाजता; तर लिव्हिंग फूडझ वाहिनीवर सोमवार, 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता होईल. भारतात पाककला ही अनेक महिलांमध्ये अंगभूतच असली, तरी तिची कदर केली जात नाही, ही गोष्ट नेस्ले कंपनीने हेरली आणि त्यातूनच या मालिकेचा जन्म झाला.आता ‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमाद्वारे ज्या बारा महिलांनी आपल्या पाककौशल्याचा वापर करून आपल्या कुटुंबियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला त्यांची ही प्रेरणादायक यशोगाथा या कार्यक्रमात उलगडून दाखविली जाणार आहे. या सर्व महिलांनी आपल्या त्यांच्या पाककलेचा वापर सर्जनशील पद्धतीने करून आधी छोट्या प्रमाणावर डबे देण्याची सेवा सुरू करून केला आणि नंतर त्याचाच विस्तार करून आपला आणि इतरांचा सामाजिक विकास साध्य केला. आपल्या या गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास कसा साध्य केला, त्याची माहिती या उद्योजिका कार्यक्रमाची सूत्रधार आणि नामवंत अभिनेत्री रेणुका शहाणे हिच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पांतून देणार आहेत. ‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील महिलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा आणि त्याद्वारे स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करण्याचा हेतू आहे. याविषयी रेणुका शहाणे सांगते, “ज्या महिलांनी आपल्या पाककलेचा वापर करून अडचणीच्या काळावर मात करत स्वत:चा उद्योग उभारला आणि स्वत:ला यशस्वी उद्योजिका बनविले अशा महिलांची ही स्फूर्तिदायक कहाणी ‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमात सादर केली जाणार आहे. अशा महिलांशी गप्पा मारताना त्यांनी हे मोठं काम कसं साध्य केलं ते जाणून घेणं हा रोचक अनुभव असेल. अशा महिलांची कहाणी सादर करून देशातील अन्य महिलांना आपल्या अंगातील अशाच एखाद्या सर्जनशील कलेचा वापर करून यशस्वी उद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.” 

टॅग्स :रेणुका शहाणे