इन्स्टाग्रामवर सध्या रिल्स(reels) चं प्रचंड वेड आहे. अनेक जण वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत रील्स पोस्ट करत असतात. यामुळे संबंधित सिनेमांचंही आपोआपच प्रमोशन होत आहे. आता हेच बघा केदार शिंदेच्या (Kedar Shinde) आगामी 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील 'बहरला हा मधुमास' हे गाणं आणि गाण्याची डान्स स्टेप तुफान गाजतीये. प्रत्येक जण गाण्यावर डान्स करताना दिसतोय. 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपानेही गाण्यावर ठेका धरला. मात्र तिचा डान्स काही नेटकऱ्यांना रुचला नाही आणि सोशल मीडियावरच तिची खिल्ली उडवण्यात आली.
'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेतील दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने गुलाबी साडीत 'बहरला हा मधुमास' गाण्यावर डान्स केला. हे रील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. मात्र तिचं रील पुरतं फसलेलं दिसतंय. गाण्याची स्टेप करताना तिचा डान्स कमी आणि गरबाच जास्त झालाय असं म्हणत तिची खिल्ली उडवली जात आहे.
रेश्माने पोस्ट केलेल्या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'खरंच जमलं नाही','चांगलं आहे पण गरबा स्टेप जास्त वाटतेय' अशा कमेंट्स तिच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. सध्या सगळीकडेच या गाण्याचा ट्रेंड आहे. सेलिब्रिटींनाही गाण्यावर रील बनवायचा मोह आवरत नाहीए. पण काही सेलिब्रिटींच्या डान्सचा पचकाच होताना दिसतोय. 'महाराष्ट्र शाहीर'हा सिनेमा महाराष्ट्रगीताचे निर्माते शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. त्यांचे नातू केदार शिंदे यांनीच सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.