मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. २९ नोव्हेंबरला तिने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली. पवन हा साऊथ इंडियन आहे. त्याची भाषा कन्नड आहे. महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. लग्नानंतर रेश्मा पुन्हा कामावर परतली आहे. दरम्यान तिने नवऱ्याला आपण अभिनेत्री असल्याचं माहितच नव्हता असा खुलासा केला आहे.
'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत रेश्मा म्हणाली, "पवन आणि मी भेटलो तेव्हा मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं. नंतर त्याला हे कळलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं होतं. मला असं वाटतं की त्याच्या मतानुसार अभिनेता, अभिनेत्री म्हणजे काहीसे अॅटिट्यूडवाले असतील असं त्याला वाटलं असणार. पण माझा कोणता आविर्भाव नाही हे बघून त्याला छान वाटलं. मी त्याला सांगितलं की बॉलिवूड वेगळं आणि मराठी टेलिव्हिजन वेगळं. आपल्याकडे छान संस्कृती आहे जी आपण पाळतो. मराठीतील कलाकार सगळे एकमेकांसोबत कुटुंबासारखेच राहतात हे मी त्याला समजावून सांगितलं."
रेश्माचा नवरा पवन आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तो युकेला स्थायिक होता. मात्र रेश्माचं अभिनयातील करिअर तसंच तिने नव्याने सुरु केलेला ज्वेलरी व्यवसाय हे पाहून त्याने पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. दोघांचं थाटात लग्न झालं. लग्नानंतर रेश्मा तिच्या बंगळुरु येथील सासरीही गेली होती. तिथे तिच्या सासरच्या मंडळींनी तिचं जंगी स्वागत केलं होतं. आता रेश्मा पुन्हा कामावर परतली आहे. ती सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसत आहे.