खांद्यावरची जबाबदारी वाढलीय-गायक अभिजीत सावंत
By अबोली कुलकर्णी | Published: September 25, 2018 07:18 PM2018-09-25T19:18:09+5:302018-09-25T19:19:01+5:30
अभिजीत सावंत याने त्याच्या मधूर गायनाने सर्व रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली. गायनासोबतच होस्ट, अँकर, अभिनेता ही क्षेत्रं देखील पादाक्रांत केली. आता हाच अभिजीत सावंत अॅण्ड टीव्हीवरील ‘लव्ह मी इंडिया’ या शोमधून कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे.
‘इंडियन आयडॉल’ हा सांगितीक शो सुरू झाला आणि त्याची सर्वत्र चर्चा गाजली. या शोचा पहिला विजेता अभिजीत सावंत याने त्याच्या मधूर गायनाने सर्व रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली. गायनासोबतच होस्ट, अँकर, अभिनेता ही क्षेत्रं देखील पादाक्रांत केली. आता हाच अभिजीत सावंत अॅण्ड टीव्हीवरील ‘लव्ह मी इंडिया’ या शोमधून कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. या शोच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद...
* अॅण्ड टीव्हीवरील ‘लव्ह मी इंडिया’ या रिअॅलिटी शोमधून तू आम्हाला कॅप्टन म्हणून भेटणार आहेस. काय सांगशील शोविषयी?
- नक्कीच खूप उत्सुकता आहे. मी आत्तापर्यंत अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रवास करत आलो आहे. तेव्हा मला हेच वाटते होते की, मी मला मिळणारे ज्ञान कुणासोबत तरी शेअर केले पाहिजे. तर आता ती संधी मला मिळणार आहे, याचा नक्कीच आनंद होत आहे. तसेच शोविषयी म्हटलं तर मी असं सांगेन की, हा लाईव्ह शो आहे. यात कुठलेही एडिटिंग, कट वगैरे होणार नाही. हीच खरंतर एक जमेची बाजू आहे, असे मी म्हणेन. यात ४ झोनल कॅप्टन्स असणार आहेत. मी महाराष्ट्र आणि पश्चिम झोन यांची जबाबदारी पार पाडणार आहे. एकंदरितच या शोची कन्सेप्ट खूपच उत्सुकता वाढवणारी आहे.
* हिमेश रेशमिया, गुरू रंधवा, नेहा भसीन हे देखील शोचे परीक्षक असणार आहेत. तर त्यांच्याबद्दल काय सांगशील?
- मी एक कॅप्टन म्हणून काम बघणार असून आम्ही कॅप्टन्सनी सिलेक्ट केलेले स्पर्धक सर्वांसमोर परफॉर्मन्स सादर करतील. त्या परफॉर्मन्सवर जजेस कमेंटस देऊन त्यांच्यातील चुका सांगतील. या शोचे वेगळेपण अजून एक असे आहे की, साधारणपणे सांगितीक रिअॅलिटी शोचे जजेस हे फिल्मबॅकग्राऊंडचे असतात. मात्र, या शोमध्ये नॉन फिल्म बॅकग्राऊंडचे जजेस असल्याने शोच्या परीक्षणाला पारदर्शकता येणार आहे.
* पहिले इंडियन आयडॉल सीझन तू जिंकले होतेस. त्यानंतर बरेच अल्बम्स, चित्रपटांसाठी तू प्लेबॅक सिंगींग केलेस. आता कसे वाटते मागे वळून बघताना?
- नक्कीच खूप छान वाटतं. अनुभव प्रचंड आला असून खांद्यावर वजन देखील तितकंच वाढलं आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चांगल्या, वाईट आठवणी मी गाठीशी बांधल्या आहेत. त्या नक्कीच मला आगामी काळात मदत करतील, याची खात्री आहे.
* तू लॉटरी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलास. त्यानंतर तीस मार खान आणि काही सीरियल्ससाठी ही काम केलेस. पुन्हा चित्रपटात काम करावे वाटले नाही का?
- नक्कीच मला काम करायला आवडेल. मी हिंदीपेक्षाही प्रथम मराठी चित्रपटांना प्राधान्य देईन. मग कलाकार कुणीही असो. फक्त मी फार भडक भूमिका करणार नाही, सौम्य भूमिका करण्याकडे माझा कल राहील.
* सध्याच्या चित्रपटातील संगीताबद्दल काय सांगशील?
- जुनं संगीत हे क्वालिटी संगीत असायचं. आता प्रत्येकच क्षेत्रात कमर्शियलायजेशन खूप जास्त प्रमाणात झालं आहे. मराठीतील संगीतकार अजय-अतुल हे आता हिंदीतही येतील. नक्कीच आता चांगले दिवस येतील, अशी आशा आहे.
* तू आणि तुझी पत्नी शिल्पा तुम्हाला दोघांनाही आम्ही ‘नच बलिए सीझन ४’ मध्ये एक डान्सर म्हणून पाहिलं होतं. तसंच तू अनेक शोचा होस्ट देखील होतास. तूला गायक, डान्सर, अँकर कोणता प्रकार जास्त आवडतो?
- अर्थात गायन हाच माझ्यासाठी जीव की प्राण आहे. त्याच गोष्टीमुळे माझं या इंडस्ट्रीत पदार्पण झालं आहे. गायनासोबतच अॅक्टिंग हे देखील माझं आवडतं क्षेत्र आहे. नक्कीच काम करायला मिळालं तर पुन्हा करीन.