Join us

'दिल दियां गल्लां' मालिकेत रेयांश चड्ढाची एन्ट्री; झळकणार डॉलरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 6:20 PM

Dil Diyaan Gallaan : एका पंजाबी कुटुंबाची भावनिक गोष्ट सांगणाऱ्या 'दिल दियां गल्लां' मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

एका पंजाबी कुटुंबाची भावनिक गोष्ट सांगणाऱ्या सोनी सब वाहिनीवरील ‘दिल दियां गल्लां’ (Dil Diyaan Gallaan) मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेने नुकतेच १०० एपिसोड पूर्ण केले आणि मालिकेचे कथानक अजूनही प्रेक्षकांना आपलेसे वाटते आहे. आगामी भागांमध्ये रिया (हेमा सूद) आणि वीर (पारस अरोरा) यांचा साखरपुडा होणार आहे. यावेळी ब्रार कुटुंबीय वेगवेगळ्या भाव-भावनांच्या विळख्यात सापडलेले दिसतील.

एका आकर्षक वळणावर डॉलर (रेयांश चड्ढा)ची एंट्री होणार आहे. डॉलर हा काहीसा उच्श्रुंखल, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आणि सहजपणे आसपासच्या लोकांचे  मन जिंकणारा एक पंजाबी मुंडा आहे. तो सतत बढाया मारत असतो आणि परदेशी जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखाद्या अनिवासी भारतीय (NRI) मुलीला गटवण्याच्या फिराकीत असतो. अमृता (कावेरी प्रियम) आणि वीर यांच्या प्रेमकहाणीत डॉलरची भूमिका लक्षणीय असणार आहे. त्याच्या आगमनामुळे वीर, अमृता आणि रिया यांच्या जीवनात कसा गुंता निर्माण होतो, हे पाहणे रोचक असेल.

डॉलरची भूमिका करत असलेला रेयांश चड्ढा म्हणतो, काहीशा भडक आणि आपल्या भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या डॉलरची भूमिका मला मिळणे हे स्वप्न साकार झाल्याचा आनंद देणारे आहे. डॉलरच्या एंट्रीमुळे मालिकेला कसे वेगळे परिमाण मिळणार आहे आणि मालिका अधिक आकर्षक होणार आहे हे प्रेक्षक बघतीलच. ‘दिल दियां गल्लां’ सारख्या कौटुंबिक मालिकेत काम करताना मला खूप आनंद होत आहे कारण ही लोकांची लाडकी मालिका आहे आणि या मालिकेत एकमेकांशी बोलून आपसातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रेक्षकाला प्रोत्साहित करण्यात येते. प्रेम आणि आशा यामुळे कसे चमत्कार घडू शकतात, हे या मालिकेत दाखवले आहे.