'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडीत (ridhima pandit). 'बिग बॉस ओटीटी'मध्ये ती अखेरची झळकली होती. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. मात्र, सध्या ती कृष्णा मुखर्जीमुळे चर्चेत येत आहे. कृष्णाने अलिकडेच 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर रिद्धिमाने तिला पाठिंबा दिला असून तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला आहे. आई मृत्युच्या दारात असतांनाही रिद्धिमाला तिच्या आईला भेटू दिलं नाही, असा मोठा खुलासा तिने यावेळी केला आहे.
रिद्धिमाने कृष्णाला पाठिंबा देत इंडस्ट्रीतील काही व्यक्तींवरचा संतापही व्यक्त केला आहे. "तिच्यासोबत जे घडलं ते खरंच फार विचित्र आणि भयानक आहे. तिच्यासोबत जे घडलं ते कोणासोबतही घडायला नको. जे लोक साधेसुधे असतात अशाच लोकांना निर्माते शोधतात आणि त्याच्या आयुष्याची वाट लावतात. तुम्ही आमच्या वेळेचे मालक आहात, आमचे नाही. त्यामुळे जर त्यावेळी आम्ही काही चुकीचं वागत असून तर आम्हाला कोर्टात खेचण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आम्ही तुमच्या शोचा चेहरा आहोत. या शोसाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करतो. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या त्रास द्याल", असं रिद्धिमा म्हणाली.
आजारी आईला भेटू शकली नाही रिद्धिमा
"रिद्धिमाने कृष्णासोबत जो प्रकार घडला तसाच काहीसा तिच्यासोबत घडल्याचंही सांगितलं. माझी आई आजारी होती मात्र, एका निर्मात्याने माझ्या आजारी आईची भेट सुद्धा मला घेऊ दिली नव्हती. छोट्या पडद्यावर खरोखरच कलाकारांना असं वाईट वागवलं जातं मात्र याविषयी कोणी काही बोलत नाही."
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने शुभशगुन या मालिकेच्या सेटवर तिच्यासोबत मानसिक अत्याचार झाल्याचं म्हटल होतं. कृष्णाने शूट करण्यास नकार दिल्यामुळे तिला मेकअप रुममध्ये बंद करण्यात आलं होतं. सोबतच निर्मात्यांनी ५ महिन्यांपासून मानधन न दिल्याचंही म्हटलं होतं.