‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळ्या महिला सेलिब्रिटी सहभागी होत असतात. ‘बस बाई बस’च्या ताज्या एपिसोडमध्ये ‘सैराट’च्या (Sairat)आर्चीनं अर्थात रिंकू राजगुरूनं (Rinku Rajguru ) हजेरी लावली. मग काय, एक ना अनेक धम्माल किस्से, सैराटच्या आठवणी असं सगळं रिंकूकडून ऐकायला मिळालं.
मी नको म्हणत होते पण त्यांनी...
‘बस बाई बस’चा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रिंकू ‘सैराट’च्या शूटींगदरम्यानचा एक किस्सा सांगतेय. ‘सैराट’ सिनेमात तुम्ही विहिरीत उडी मारली की सगळ्या पोरींना तुमचं कौतुक वाटलं. तुम्हाला आधीच पोहता येत होतं का? असा प्रश्न रिंकूला विचारला गेला. यावर उत्तर देत रिंकू म्हणाली,‘मला आधीच पोहायला येत होतं. बाबांनी उन्हाळ्याच्या मला शिकवलं होतं. पण त्याचा उपयोग मला ‘सैराट’साठी झाला. पोहायला येत असलं तरी उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा फारच भीती वाटली होती. मी घाबरत होते. मी नाही करत हा शॉट, असं मी म्हणाले होते. नकोच म्हणत होते. त्यावेळी सगळे मला म्हणाले की, उडी मारते की ढकलून देऊ. त्यावेळी मी म्हटलं, नको नको...मी मारते उडी . त्यानंतर विहिरीत उडी मारण्याचे दोन टेक झाले. पहिल्या टेकला चेहºयावर टेन्शन होतं. पण नंतर ओके झालं...
गेल्या जन्मी तू रूक्मिणीचा अवतार होतीस...एका ‘सैराट’ चाहत्याचा किस्साही तिने या कार्यक्रमात ऐकवला. तिने सांगितलं,‘ आम्ही बाहेर जातो, तेव्हा अनेक चाहते भेटतात. आम्ही त्यांना भेटतो, हात दाखवतो, स्माईल देतो. एका कार्यक्रमात गेले असता एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला. नंतर मी त्याला विसरूनही गेले होते. पण एकेदिवशी अचानक तो चाहता घरी आला आणि माझ्या आई-बाबांना थेट, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं असल्याचं म्हणाला. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तेव्हा या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या..., असं तो म्हणाला. त्यानंतर त्याने माझा पिच्छा पुरवायला सुरूवात केली. मी परिक्षा द्यायला गेले तर तो परिक्षा केंद्राबाहेर उभा होता. तो मला पैसे देत होतो. मी घाबरले होते. घरातीलही सगळे घाबरले होते. अखेर आम्ही रितसर पोलिस तक्रार केली.’
रिंकूने घातली अंगावर गाडी?‘सैराट’मध्ये रिंकू ट्रॅक्टर, बुलेट चालवताना दिसली. तिच्या खऱ्या आयुष्यातील एक धम्माल किस्सा मात्र तुम्हाला ठाऊक नसेल. गाडी कोणाच्या अंगावर घातलीस तू? असा प्रश्न सुबोध भावेने तिला केला. यावर ती म्हणाली, एका सेटवर काम करत असताना मला थोडा ब्रेक मिळाला. त्या वेळेत मी गाडी चालवते म्हटलं. आमच्याकडे मेकिंगसाठी ललित खाचरे म्हणून मुलगा होता. प्रचंड उत्साही. गाडी चालवताना मेकिंग करायला कोणी आडवं येतं का? मी गाडी चालवत होते आणि त्याने समोर टणकन उडी मारली. माझी काय चूक? कसा ब्रेक मारणार? त्याच्या पायावरून माझ्या गाडीचं चाक गेलं. हा, त्याला फार लागलं नाही...’