‘निम्की मुखिया’ या मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे मंगळवारी (17 जुलै) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रीटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली.काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.रिटा भादुरी यांना मूत्रपिंडाच्या व्याधीने ग्रासले होते. त्यांना एक दिवसाआड डायलिसिसचा उपचार घ्यावा लागत असे. डायलिसिसवर असूनही रिटा भादुरी 'निम्की मुखिया' मालिकेत काम करत होत्या.
वयाच्या 62व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरूण पिढीलाही लाजवेल असाच होता.मालिकेच्या सेटवर त्यांची खूप काळजीही घेतली जायची.शूटिंग दरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेत त्या आराम करायच्या. इतकेच नव्हे, तर ‘निम्की मुखिया’ या मालिकेची सर्व टीम त्यांच्या उपचाराच्या तारखेनुसार चित्रीकरणाच्या तारखा उपलब्ध करून देत.
रिटा यांची खराब प्रकृती आणि कामासाठी त्यांची आस्था पाहून टीवी मालिका निमकी मुखियामध्ये त्यांना त्यांच्या सवडीप्रमाणे शूटिंग शेड्यूल ठेवण्यात यायचे. यासंदर्भात रिटा भादुरी यांनी सांगितले होते की, “प्रत्येकजण कधी ना कधी आजारी पडतोच आणि त्यातून बाहेरही येतो.फक्त तुमच्या अखेरच्या आजारातून कोणी वाचु शकत नाही. मला अभिनय करण्यात आणि कामात सतत व्यग्र राहायला आवडतं.मला सर्व प्रकारे मदत आणि सहकार्य करणारे माझे सहकलाकार, मालिकेची संपूर्ण टीम माझ्यासाठी खूप मेहनत घेते. आज ही सगळी मंडळी माझ्या कुटुंबाप्रमाणेच माझी काळजी घेतात. या पेक्षा मोठं भाग्य ते काय असू शकतं. असे सहकारी असले की, तुम्हालाही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळते.” रिटा भादुरी यांचा शेवटचा शूटिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये 'निमकी मुखिया' या मालिकेच्या शूटिंगमध्ये योगा करताना दिसत आहेत.
'साराभाई वर्सेस साराभाई', 'अमानत', 'एक नई पहचान', 'बायबल की कहानियाँ', यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर 'सावन को आने दो', 'राजा', 'लव्ह', 'विरासत', 'घर हो तो ऐसा' यांसारख्या अनेक सिनेमांमध्येही त्यांनी दमदार अभिनय केला होता. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे.