'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच सरप्राईजेस मिळत आहे. त्यातच घरातील काही स्पर्धकांच्या एन्ट्री देखील प्रेक्षकांची सरप्राईजच होत्या. घरात छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरोडेच्या एन्ट्रीने सगळ्यांनाच धक्का बसला. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीला बिग बॉसच्या घरात पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यापासून छोटा पुढारी आपली मते मांडताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकेंडचा वार म्हणजेच भाऊचा धक्क्यावर छोट्या पुढारीनं 'मराठी कार्ड'वर थेट भुमिका घेतली.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्याच आठवड्याचा विकेंडच्या वारमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेतली. रितेशने 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिला धारेवर धरत ती 'मराठी कार्ड' वापरते अशी टीका केली.रितेश म्हणाला की, 'या घरामध्ये खेळण्यासाठी बरेच जण एक कार्ड वापरतायत ते म्हणजे 'मराठी कार्ड'.' रितेशने अंकिताला विचारलं की, 'मराठी माणसाला हे आवडत नाही ते आवडत नाही, मराठी संस्कृतीत हे बसत नाही ते बसत नाही, हे तुम्ही का ठरवताय? तुम्ही तुमचा गेम खेळा. आम्ही प्रेक्षक, मराठी माणसं आमचं आम्ही ठरवू काय आवडतं, काय नाही ते".
पुढे रितेश अंकिताला म्हणाला, 'पहिल्याच दिवशी तुमची कोणासोबत ओळख नव्हती. तेव्हा तुम्ही इरिनाला पाहून म्हणालात, तिच्यामुळे एका मराठी कलाकाराची जागा गेली'. त्यावर अंकिता म्हणाली की, 'मी आजही या मतावर ठाम आहे. कारण कितीतरी मराठी कलाकार आहेत. ज्यांना बिग बॉस मध्ये यायचं असतं' अंकिताने मला छोटा पुढारी यांनी केलेले नॉमिनेशन पटले नाही असे म्हटलं.
यावर छोट्या पुढारीनेसुद्धा अंकितावर नेम धरत ती 'मराठी कार्ड' वापरते याचं स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, 'सर, मुद्दा माझा कायपण असू दे. माझा चुकलेला मुद्दा सांगा. पण तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना.. मराठी माणसाला पुढे जाऊ द्या..हा डाव आहे' असे म्हटले. तसेच रितेशने देखील त्याचे अगदी बरोबर असल्याचे सांगितलं.
छोटा पुढारीने अंकिताचा नॉमिनेशचा किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये त्याने डीपी म्हणजेच धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यावर अंकिता त्याच्याकडे पळत गेली होती. तिने 'अरे मराठी माणसाला नॉमिनेट केलं, मराठी माणसाच्या छातीवर पाय देणार, अहो सर मग आम्ही कोण आहेत? मराठी माणूस... अरे मराठी माणसाला पुढे जाऊ द्या... बाहेरच्या, इंग्रजी बोलणाऱ्या मुलीला तुम्ही नॉमिनेट नाही केलं' असे म्हटल्याचे सांगितले.