Bigg Boss : 'बिग बॉस'ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. 'बिग बॉस'चा खेळ हा एकूण शंभर दिवसांचा असतो. मात्र, यंदाचा 'बिग बॉस मराठी' हा 100 दिवसांचा नाही तर 70 दिवसांचा आहे. हे 'बिग बॉस'कडून जाहीर करण्यात आलेलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले हा जवळ आला आहे. पण, आता यातही एक ट्विस्ट असणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे 'बिग बॉस हिंदी'च्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आहे. मराठीचा ग्रँड फिनाले आणि हिंदीचा ग्रँड प्रीमियर हा एकाच दिवशी होणार आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा हा येत्या 6 ऑक्टोंबरला होणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला 'हिंदी बिग बॉस'च्या 18 व्या सीझनचा ग्रँड प्रीमियरदेखील 6 ऑक्टोबरलाच रात्री ९ वाजता होणार आहे. अर्थातच रितेश आणि सलमान या दोन चांगल्या मित्रांचीही टक्कर होणार आहे.
'बिग बॉस'चे दोन्ही सीझन एकमेकांना भिडणार असल्याने प्रेक्षकदेखील नाराज झाले आहेत. तसेच मराठी बिग बॉस लवकर संपवण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. येत्या 6 ऑक्टोबर रोजी आता प्रेक्षकवर्ग सुद्धा विभागला जाण्याची शक्यता आहे. 'हिंदी बिग बॉस'च्या ग्रँड प्रीमियरची वेळ जाहीर करण्यात आली असली तरी 'मराठी बिग बॉस'च्या ग्रँड फिनाले नेमका किती वाजता होणार, हे जाहीर करण्यात आलेले नाही. जर 'मराठी बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेची वेळ बदलण्यात आली तर कदाचित ही टक्कर टाळली जाईल. पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.