बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. रितेश देशमुख नवीन सीझनचं होस्टिंग करतोय. या सीझनमध्ये विविध स्पर्धक सहभागी आहेत. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार यांसारखे सोशल मीडिया स्टारही सहभागी आहेत. या सर्वांमध्ये मराठमोळा अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेही सर्वांना टक्कर देताना दिसतोय. बिग बॉसमध्ये झालेल्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर पॅडीचं चांगलंच कौतुक होताना दिसलं.
रितेशने केलं पॅडीचं कौतुक
बिग बॉस मराठीमध्ये काल भाऊचा धक्का झाला. यावेळी रितेशने पॅडीच्या खेळाचं चांगलंच कौतुक केलं. रितेश म्हणाला, "पॅडीभाऊ, पहिल्या दोन आठवड्यातला तुमचा खेळ पाहून मला असं वाटलेलं तुम्ही पिकनीक स्पॉटवरुन उठणारच नाही. पण पहिल्यांदा तुम्ही उठलात आणि थेट मैदानातच उतरलात. निक्कीच्या सामानाचं कंटेनर तुम्ही हलवलंत. ते कंटेनर नाही तर निक्कीचं साम्राज्य तुम्ही हलवलंत. तुमचा मुद्दा बरोबर होता. कीप इट अप."
पॅडीने निक्कीला दिलेलं आव्हान
या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशीच पॅडी आणि निक्कीमध्ये चांगला वाद झालेला. निक्कीचं सामान घरात मध्येच पडलं होतं. पॅडी ते सामान उचलायला गेला. पॅडीने सामान हलवलं. ते बघताच निक्कीचा पारा चढला. तिने रागाच्या भरात सर्वांचे कपडे इकडून तिकडे काढायला सुरुवात केली. त्यामुळे पॅडीचाही संताप अनावर झाला. त्यानेही निक्कीवर आवाज चढवला. अशाप्रकारे घरात पहिल्यांदाच पॅडीचा आक्रमक अवतार बघायला मिळाला.