Join us  

सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखचं ट्विट; म्हणाला, "राजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 9:53 AM

काय आहे रितेशचं ट्वीट?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल कोसळला. आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं. कालच्या या दुर्दैवी घटनेनंतर समस्त शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) या प्रकरणी ट्वीट करत महाराजांची माफी मागितली आहे. काय आहे रितेशचं ट्वीट?

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पुतळ्याचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं असा आरोप करण्यात येतोय. यासंबंधित लोकांवर कारवाईही सुरु करण्यात आली आहे. दरम्यान शिवप्रेमी आणि विरोधकांमधून संताप व्यक्त केला जातोय. अभिनेता रितेश देशमुखने अगदी मोजक्या शब्दात ट्वीट करत लिहिले, 'राजे माफ करा.'  घडलेल्या प्रकारावर रितेशने महाराजांची माफी मागितली आहे. त्याच्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत सरकारविरोधात आवाज उठवला आहे. 

नौदल दिनानिमित्त दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता. गेले दोन, तीन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच दुपारी वादळीवाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. याप्रकरणी आता कंत्राटदार, शिल्पकारावर कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :रितेश देशमुखसिंधुदुर्गछत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्रसोशल मीडिया