महाराष्ट्राला वेड लावणारा अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) लवकरच 'बिग बॉस मराठी ५'चं (bigg boss marathi 5) सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याआधी 'बिग बॉस मराठी'च्या चार सीझनचं होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केलं होतं. आता पाचव्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. जेव्हापासून रितेश 'बिग बॉस मराठी ५'चं होस्टिंग करणार आहे हे कळाल्यावर त्याची आणि मांजरेकरांची (mahesh manjrekar) तुलना केली जात आहे. 'लोकमत फिल्मी'ने हा प्रश्न विचारताच रितेशने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
मांजरेकरांसोबत होणाऱ्या तुलनेवर रितेश म्हणाला...
रितेश देशमुखने या विषयावर मौन सोडलंय. तो म्हणाला, "काय आहे ना, आधीच लोकप्रिय असणाऱ्या एका शोसाठी कोणताही नवीन होस्ट आला, तर तुलना होणं साहजिक आहे. त्यात काही दुमत नाही. मला वाटतं हिंदीमध्ये सलमान भाऊंची जी होस्टिंग आहे ती त्यांची वेगळी स्टाईल आहे. महेश मांजरेकरांनी सुद्धा जसं होस्ट केलं मला वाटतं ती त्यांची स्वतःची युनिक स्टाईल होती. सलमान भाऊंसारखी महेश मांजरेकरांची होस्टिंग नव्हती. त्यांची वेगळी शैली होती, अॅटिट्यूड वेगळा होता. मांजरेकरांच्या पर्सनॅलिटीला नॅचरली जे सुट करतं तेच प्रेक्षकांना आवडलं. मलाही प्रचंड आवडलं. आता मी होस्ट करतोय तर मी असा होस्टिंगचा कोणताही प्लॅन केला नाहीये. नॅचरली तुमच्या पर्सनॅलिटीला जसं जुळून येईल तसं होस्ट करण्याचा प्रयत्न करेल."
या तारखेपासून सुरु होणार 'बिग बॉस मराठी ५'
प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन २८ जुलैपासून दररोज रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर आणि Jiocinema वर कधीही बघायला मिळणार आहे.