Join us  

सलील अंकोलाला साकारायची आहे ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2016 6:11 PM

सलिल अंकोलाने एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर तो अभिनयाकडे वळला. त्याने कोरा कागज, कर्म अपना ...

सलिल अंकोलाने एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर तो अभिनयाकडे वळला. त्याने कोरा कागज, कर्म अपना अपना यांसारख्या मालिकांमध्ये तर कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले. सलील कित्येक वर्षांनंतर आता छोट्या पडद्यावर परतत आहे. कर्मफल दाता शनी या मालिकेत तो सूर्यदेवाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...तुझ्या कारकिर्दीत तू पहिल्यांदाच एका पौराणिक मालिकेत काम करत आहेस, पौराणिक मालिकेत आणि इतर मालिकांमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवला?कर्मफल दाता शनी ही मालिका पूर्णपणे पौराणिक मालिका आहे असे मी म्हणणार नाही. शनीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक गैरसमजुती असतात, याच गैरसमजुती दूर करण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. मी स्वतः शनीचा भक्त आहे. पण शनिविषयी मला तितकीशी माहिती नव्हती. या मालिकेमुळे मला अनेक गोष्टी जाणता आल्या. लोकांनादेखील ही मालिका पाहिल्यानंतर शनीविषयी अनेक गोष्टी कळणार आहेत. शनीची महादशा सुरू झाल्यावर ती वाईट नसून काही वेळा ती चांगलीदेखील असते हेदेखील आमच्या मालिकेतून लोकांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही ज्यावेळी पौराणिक मालिका करता त्यावेळी तुम्हाला तुमची भाषा, उच्चार यांवर जास्त मेहनत घ्यावी लागते. तसेच अनेक किलोचे दागिने घालून चित्रीकरण करावे लागते हा पौराणिक मालिका करतानाचा फरक मला जाणवला. या मालिकेत तू 22 किलोची ज्वेलरी घातली आहे, हे खरे आहे का?मला खरे तर या मालिकेबद्दल विचारण्यात आले त्यावेळी ही मालिका स्वीकारू की नाही या द्विधा मनस्थितीत अडकलो होतो. कारण मी त्या कपड्यात लोकांना आवडेल की नाही याची मला शंका होती. पण निर्मात्यांनी या भूमिकेसाठी मी योग्य आहे हे समजवल्यामुळेच मी या मालिकेचा भाग बनलो. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी मी 22 किलोचे दागिने तर 5 किलोचा मुकूट घालतो. इतक्या वजनाचे दागिने, मुकूट घालून अभिनय करणे खरेच अवघड आहे. पण आता हळूहळू मला याची सवय व्हायला लागली आहे. तू कोरा कागज या मालिकेत एक रोमँटिक भूमिका साकारली होतीस अशा प्रकारची भूमिका परत साकारण्याचा तुझा काही विचार आहे का?कोरा कागज या मालिकेच्यावेळी मी खूप तरुण होतो. आता वय वाढले आहे त्यामुळे मी नक्कीच तशी भूमिका साकारू शकत नाही. पण एखादी मॅच्युअर्ड लव्हस्टोरी करायला मला नक्कीच आवडेल आणि सध्या छोट्या पडद्यावर प्रत्येक वयोगटातील लोकांना चांगल्या भूमिका मिळत आहेत. त्यामुळे पुढील काळात मला चांगली भूमिका मिळाली तर प्रेक्षकांना पुन्हा मी रोमँटिक भूमिका साकारताना पाहायला मिळेल.तू तुझे अनेक किलो वजन कमी केले असून तू एकदम फिट झाला अाहेस, याचे रहस्य काय?आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे असे मला नेहमी वाटत होते. पण त्यासाठी मी कधीच तितके प्रयत्न केले नव्हते. पण वर्षभरापूर्वी आपण आता चांगली शरीरयष्ठी बनवायची असे मी ठरवले आणि त्याचमुळे मी व्यायाम आणि डाएट करायला सुरुवात केली. खरे तर त्यावेळी मी ही मालिका करेन असा विचारदेखील केला नव्हता. पण आता मला या शरीरयष्ठीची खूप मदत होत आहे.