उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. परिणामी अनेक ठिकाणची रस्ते बंद झाले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्येच प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक हिचे कुटुंबीय हिमाचलमध्ये अडकले आहेत. याविषयी अभिनेत्रीने चिंता व्यक्त केली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (rubina dilaik) ही मूळची हिमाचल प्रदेशची आहे. कामानिमित्त ती जरी मुंबईत राहत असली तरी तिचं संपूर्ण कुटुंब आजही हिमाचलमधील शिमला येथे स्थायिक आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये मोठी पर्जनवृष्टी होत आहे. याविषयी टीव्हीवर अनेक व्हिडीओ, फोटो दिसत असल्यामुळे रुबिनाला सतत तिच्या कुटुंबियांची काळजी वाटत होती. याविषयी तिने 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली असून या पूरपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.
"टिव्हीवर दाखवण्यात येत असलेली दृश्य खूप घाबरवणारी आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा तिथे नेटवर्क नव्हता त्यावेळी कित्येक काळ कुटुंबियांशी संपर्क करता येत नव्हता. मला त्यांची खूप काळजी वाटत होती. पण, सुदैवाने आता संपर्क होऊ लागला आहे आणि ते सगळे सुखरुप आहेत", असं रुबिना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "आमचं घर डोंगरावर आहे. त्यामुळे सगळे जण घरात सुरक्षित होते. पण, भूस्खलनामुळे तितकंच नुकसानही होतं. मात्र, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल."
दरम्यान, रुबिनाच्या कुटुंबियांप्रमाणेच अभिनेता रुसलान मुमताजदेखील मनालीतील पुरात अडकला आहे. आगामी वेब सीरिजच्या शूटसाठी तो मनालीमध्ये गेला होता. परंतु, पुरामुळे त्याला तेथून निघता आलं नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत त्याने तो राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं सांगितलं. त्यामुळे तो सध्या एका शाळेत थांबला आहे.