टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) वर्षभरापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. दोन्ही मुलींची विशेष काळजी घेत आहे. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ती आई झाली. नुकतंच रुबिनाने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने मुलींविषयी बोलताना मोठा खुलासा केला. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांनी आपल्या मुलींना मुंबईत नाही तर हिमाचल प्रदेशमध्येच ठेवलं आहे.
पारस छाबडाला दिलेल्या मुलाखतीत रुबिना दिलैक म्हणाली, "मुलींना चांगल्या वातावरणात वाढवायचं यासाठी अभिनव आधीपासूनच आग्रही होता. जेव्हा आम्ही बेबी प्लॅनिंग करत होतो तेव्हाच आम्ही ठरवलं की मुलांना कुठे वाढवायचं. त्यांची गावाशी नाळ कायम जोडलेली राहावी असाच आमचा त्यामागे विचार होता. आम्हाला त्यांना शुद्ध हवेच्या वातावरणातच ठेवायचं आहे. त्यांना मातीत खेळू दे, चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये लहानाचे मोठे होऊ दे असं आम्हाला वाटतं. आपल्याच शेतीतून पिकलेलं अन्न त्यांना खायला मिळायला हवं आणि त्यांना त्याची जाणीव व्हावी असाही आमचा या मागचा उद्देश आहे."
रुबिना दिलैक ही हिमाचल प्रदेशची आहे. म्हणूनच तिने मुलींना तिथेच ठेवलं. तिच्या दोन्ही मुलींचा जन्म मुंबईतच झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर २-३ महिन्यातच ते हिमाचलला शिफ्ट झाले. आता ती मुंबईत फक्त कामासाठी येते. तसंच आतापर्यंत तिने मुलींना मीठ आणि साखरेचे चव चाखायला दिलेली नाही.
रुबिना आता 'लाफ्टर शेफ्स सीझन २' मध्ये दिसणार आहे. यामध्ये राहुल वैद्य, अंकिता लोखंडे, विक्की जैन हे देखील आहेत रुबिनाने शूटिंगला सुरुवात केली आहे.