छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक नुकतीच आई झाली आहे. रुबिनाने २७ नोव्हेंबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तेव्हापासून या मुलींची झलक पाहण्यासाठी, त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अलिकडेच रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्लॉग शेअर केला. या व्लॉगमध्ये तिने तिच्या मुलींची नावं आणि त्या मागचा अर्थ सांगितला आहे.रुबिनाने नुकताच तिच्या युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये लेकींच्या जन्मानंतर तिचं आयुष्य कसं बदललं आहे हे तिने सांगितलं. रुबिनाने तिच्या लेकींची नाव जीवा आणि एधा अशी ठेवली आहेत. मुलींची ही नाव ऐकल्यानंतर अनेकांनी या नावांचा अर्थ काय असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर तिने नुकतंच दिलं आहे.
काय आहे रुबिनाच्या लेकींच्या नावाचा अर्थ
एधा आणि जीवा ही दोन्ही नावं देवींच्या नावावरुन ठेवण्यात आली आहे. एधा म्हणजे समृद्धी आणि जीवा म्हणजे जीवनरेखा. आम्ही बाळांच्या जन्मापूर्वीच ४ नावं ठरवून ठेवली होती. आम्हाला जुळी मुलं होणार हे आधीपासूनच माहित होतं. त्यामुळे आम्ही दोन मुलांची आणि दोन मुलींची अशी ४ नावं काढून ठेवली होती.
"आमच्या लेकींचा जन्म झाल्यावर मोठ्या मुलीचं नाव एधा आणि धाकटीचं नाव जीवा ठेऊयात असं आमचं ठरलं होतं. दोघींच्या शरीराची बांधणी, त्यांचे चेहरे वेगवेगळे आहेत. त्यांच्याविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे. पण, सध्या मी तुमच्या सगळ्यांचे फक्त आभारच मानेन", असं रुबिना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "हल्ली मला फार विसरायला होतं. मी कॉफी तयार करुन ठेवते पण दीड तासाने मला आठवतं की मला कॉफी प्यायची होती. आजकाल मला बऱ्याच गोष्टी विसरायला होतात. पण, मी हे सगळं एन्जॉय करते."