'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची भूमिका साकारून अभिनेत्री रुपाली भोसलेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. खलनायिकेच्या भूमिकेतही रुपालीने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडलं. जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'आई कुठे काय करते' मालिकेने निरोप घेतला. आता मालिका संपल्यानंतर रुपाली नव्या शोमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रुपाली भोसलेची स्टार प्रवाहवरील एका शोमध्ये वर्णी लागली आहे. 'लाफ्टर शेफ' या हिंदी सेलिब्रिटी कुकिंग शोसारखा 'शिट्टी वाजली रे' हा नवा शो स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. यामध्ये सेलिब्रिटींना त्यांचं पाककौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या शोमध्ये अभिनेत्री रुपाली भोसलेदेखील दिसणार आहे. या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रुपालीला पाहून चाहते खूश झाले आहेत. आता रुपाली या शोमधून तिच्या पाककौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं रंजनकारक असणार आहे. रुपालीला या नव्या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहे.
'शिट्टी वाजली रे' शोचं सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ करणार आहे. तर या शोमध्ये शेफ जयंती कठाळे सेलिब्रिटींनी कुकिंग चॅलेंज देताना दिसतील. 'शिट्टी वाजली रे' या स्टार प्रवाहच्या नव्या शोमध्ये गौतमी पाटील आणि छोटा पुढारी घनश्याम दरवडे यांचीदेखील वर्णी लागली आहे. तर पुष्कर क्षोत्री, स्मिता गोंदकर, निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक हे सेलिब्रिटीही दिसणार आहेत. 'शिट्टी वाजली रे' हा नवा शो येत्या २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.