Join us

घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रुपाली भोसलेनं व्यक्त केल्या भावना, म्हणाली - सतराशे साठ घरं बदलली. त्या प्रवासात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 6:40 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने ठाण्यात स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. तिचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने ठाण्यात स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. तिचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. २९ जून रोजी तिने नवीन घराची वास्तुशांती केली. यावेळी कलाविश्वातील कलाकार आले होते. दरम्यान आता तिने घराचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

रुपाली भोसले हिने घराचे पेपर साइन करण्यापासून घरातील काही क्षणांचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ह्या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतःचं  हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही. लहानपणी निसर्ग चित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्समध्ये घर काढतो त्या स्टेप्स मध्येच माझं घर पूर्ण होत गेलं फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती. 

तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात राहत होतो

तिने पुढे लिहिले की, कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेप सुद्धा माझ्यासाठी एका वेळेसचं घर होतं कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो. आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं पण पेन्सिलीने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात रहात होतो. केवळ भिंती...छप्पर असं काहीच नव्हतं…हा शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं आमच्याकडे. मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं...आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं एवढं काही वाटायचं नाही...फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीनला उठून आंघोळ करावी लागायची. पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली... त्या सगळ्या प्रवासात अनेकदा ह्या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून, फाडून फेकून द्यावा वाटला. 

स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं...पण स्वप्न दाखवणाऱ्याला खचून चालत नाही कारण त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं... अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं..परमेश्वराचे, आईवडीलांचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्सच्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेत सोबत प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद!!! आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची.. मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर.., असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिका