'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिंदी बिग बॉस पाहत असते. तिला यावेळी हिंदी बिग बॉसची ऑफरही होती जी तिने नाकारली होती. रुपाली मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची स्पर्धक आहे. २०१९ साली ती बिग बॉस २ मध्ये दिसली आणि प्रसिद्धीझोतात आली. यानंतर 'आई कुठे काय करते' मालिकेत तिला खलनायिकेच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. नुकतंच रुपालीने सध्या चालू असलेल्या हिंदी बॉसमधील एका स्पर्धकाची कानउघाडणी केली.
'मधुबाला' फेम अभिनेता विवियन डिसेना (Vivian Dsena) सध्या बिग बॉस १८ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याच्या चार्मिंग पर्सनॅलिटीवर तरुणी फिदा आहेत. अनेकदा विवियनची दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना होते. दुसरीकडे रुपाली मात्र व्हिव्हियनवर जाम भडकली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "देवा काय हा अॅटिट्युड. सिद्धार्थ शुक्ला मोठा स्टार होता आणि आहे. पण तो बिग बॉसच्या घरात जसा होता ते कौतुकास्पद होतं. पण या विवियनबद्दल काय बोलायचं... थंब्स डाऊन..."
रुपालीने सोशल मीडियावर विवियनबद्दल राग व्यक्त केला आहे. विवियन प्रचंड अॅटिट्युड दाखवतो असं अनेकांना वाटतं. नुकताच तो घरात कॅप्टन पदावर होता. तेव्हा त्याने ज्याप्रकारे त्याच्या ग्रुपलाच फेवर केलं, त्यांना कमी दिलं आणि इतर सदस्यांसोबत वाद घातला यावरुन त्याच्यावर खूप टीका होत आहे. प्रेक्षकांनाही हे खटकलं. रुपालीने यावरुनच त्याची कानउघाडणी केली आहे.
रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसली. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यानंतर रुपाली कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.