Join us

'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:44 IST

Rupali Ganguly: रुपाली आज एका मुलाची आई असून तिचा लेक रुद्रांश सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.

रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हे नाव छोट्या पडद्यावर चांगलंच लोकप्रिय आहे. अनुपमा या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविषयी वरचेवर चर्चा रंगत असते. उत्तम अभिनय आणि हसमुख स्वभाव यांच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्ये अलिकडेच तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी मोठा खुलासा केला आहे. एक काळ असा होता जेव्हा डॉक्टरांनी तिला कधीच आई होऊ शकणार नाही, असं सांगितलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

'इंडिया फोरम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुपालीने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. यात 'मी कधीच बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे मी IVF ची मदत घ्यावी', असा सल्ला मला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, योग्य उपचार केल्यानंतर मी नैसर्गिक पद्धतीने प्रेग्नंट राहिले आणि नॉर्मल डिलीव्हरी सुद्धा झाली, असं रुपालीने सांगितलं. 

नेमकं काय घडलं रुपालीसोबत?

"मी कायम नॅच्युरल पद्धतीने बाळाला जन्म द्यावा असंच मला वाटत होतं.  कारण, आई होतांना ज्या कळा सोसाव्या लागतात त्या मला अनुभवायच्या होत्या.माझ्या लेबर पेनच्या काळातला प्रत्येक मिनीट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ज्यावेळी तुम्हाला सांगण्यात येतं की तुला काहीच मिळणार नाही. त्यावेळी तुम्हाला हवं ते मिळतं त्यावर तुमचं निस्वार्थ प्रेम असतं", असं रुपाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "जवळपास ९ तास मी लेबर पेन सहन केलं. सकाळपासून मला कळा सुरु झाल्या होत्या आणि संध्याकाळ झाली तरी मला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केलं नव्हतं. कदाचित मी एकटीच अशी स्त्री असेल जी लेबर पेनमध्ये रडली सुद्धा आणि हसली सुद्धा. ज्यावेळी मी रुद्रांशला पाहिलं त्यावेळी मी त्याच्या प्रेमात पडले. पहिल्याच नजरेत प्रेमात पडणं काय असते हे रुद्रांशकडे पाहिल्यावर मला कळलं."

दरम्यान, रुपालीने अश्वीन वर्मासोबत लग्नगाठ बांधली आहे. अश्वीन यांनी रुपालीचं करिअर घडवण्यासाठी स्वत:च्या करिअरला बाजूला ठेवलं. सध्या ते मुलाचा रुद्रांशचा सांभाळत करत असल्याचं म्हटलं जातं.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी