छोट्या पडद्यावरील नवीन मालिका ‘माय नेम इज लखन’ ही एका तरुणाने सुधारणेच्या मार्गावर जाण्याच्या केलेल्या प्रयत्नांची कथा आहे. बॉलीवूडमधील काही सुप्रसिद्ध कलाकार जसे की श्रेयस तळपदे, अर्चना पुरणसिंग, परमीत सेठी आणि संजय नार्वेकर प्रथमच टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकत्र येत आहेत. या मालिकेबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना श्रेयस तळपदे अर्थात लखन म्हणाला, “‘माय नेम इज लखन’ या मालिकेतून टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे. या मालिकेची संकल्पना भन्नाट आहे आणि आताच्या काळाशी सुसंगत आहे. माझ्यासाठी तर ही जणू काही लाईफटाईम भूमिका आहे. आजवरच्या माझ्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीच रंगमंचावर, टीव्हीवर वा चित्रपटात केली नव्हती. त्यामुळे या मालिकेचा भाग मला होता आले याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सेटवरचा प्रत्येक क्षण मी जगलो आहे. जेव्हा तुम्ही ही मालिका टीव्हीवर बघाल तेव्हा तुम्हांलाही ती खूप आवडेल अशी मला आशा आहे.”
अर्चना पुरणसिंग म्हणजेच पमी सह-कलाकारांबद्दल बोलताना म्हणाली, “माय नेम इज लखन ही सोनी सब वरील यावर्षीची सर्वाधिक अफलातून मालिका असणार आहे. या मालिकेचे शुटिंग करताना मला खूप मजा आली. मला जेव्हा-जेव्हा कोणत्याही मालिकेचे किंवा चित्रपटाचे शुटिंग करताना खूप मजा आली तेव्हा-तेव्हा ते काम सर्वोत्तम झाले आहे आणि मी केलेले सर्वाधिक यशस्वी काम ठरले आहे. कुछ कुछ होता है, श्रीमान श्रीमती आणि इतर अनेक बाबतीत ही गोष्ट खरी ठरली आहे आणि माय नेम इज लखन बाबतही हे नक्की खरं ठरेल, अशी मला आशा आहे. श्रेयस, परमीत, संजय नार्वेकर, नासीर आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान आहे आणि जी जादू आम्ही मोठ्या पडद्यावर साकारतो तशाच प्रकारची जादू टीव्हीच्या छोट्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
संजय नार्वेकर अर्थात लकी भाई म्हणाला, “ही मालिका विनोद, रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ असणार आहे. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करताना याला थोडा फिल्मी टचही देण्यात आला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमची मालिका अवश्य बघावी अशी विनंती मी करत आहे. तुम्हांला मालिका आवडली तर आमचं कौतुक करा आणि जर आम्ही काही चुका केल्या असं तुम्हांला वाटत असेल तर अवश्य आमचे कान पकडा. पण त्यासाठी कृपया 'माय नेम इज लखन' ही मालिका बघा.”
'माय नेम इज लखन' ही मालिका म्हणजे नव्याने आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखनचा प्रवास आहे. आपल्या या नव्या मार्गावरुन प्रवास करताना आपल्या स्वतःच्या “अंदाजात” चांगल्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नांत अनेकदा विनोदी प्रसंग निर्माण होतात.