गायन क्षेत्रातील भारताचा नवा सुपरस्टार कोण याचा शोध घेणाऱ्या ‘सा रे ग म प’च्या नव्या पर्वाच्या अंतिम 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. येत्या वीकेण्डच्या भागात या कार्यक्रमातील परीक्षक-गुरू शेखर रावजियानी, रिचा शर्मा आणि वाजिद खान या तिघांच्या टीममधील या स्पर्धकांचा प्रभावी आणि अप्रतिम गायन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
आता अंतिम 15 जणांमध्ये निवड झाल्यावर हे स्पर्धक परीक्षक, श्रोते तसेच ज्यूरी सदस्यांवर आपल्या उत्कृष्ट गायनाने छाप पाडण्याचा कसून प्रयत्न करणार आहेत. हे सर्वच स्पर्धक दर्जेदार असले, तरी मणिपूरची निवासी असलेली मंदाकिनी तखेल्लम्बम हिने आपल्या सुरेल आणि गोड आवाजाने लक्षावधी रसिकांची मने जिंकली आहेत. मंदाकिनी जरी दृष्टीहिन असली, तरी तिची हार न मानण्याची जिद्द अनेकांना प्रेरणा देऊन जाते.
तिच्या या डोळस जिद्दीला मानवंदना देण्यासाठी मणिपूरचे माननीय मुख्यमंत्र्यांनी मंदाकिनीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहिर केले आहे. तिने आपल्या दर्जेदर आवाजाने मणिपूरची प्रतिष्ठा वाढविल्याची पावती म्हणून तिला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मंदाकिनीच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला परीक्षक शेखर रावजियनी म्हणाला, “मंदाकिनी, तू म्हणजे या मंचावरची जादू असून तू सर्वांसाठी एक आशीर्वाद ठरली आहेस. तुझं गाणं अप्रतिम असून तुझ्यासारख्या स्पर्धकाला ‘सा रे ग म प’ कार्यक्रमात आपल्या राज्याचं प्रतिनिधित्त्व करताना पाहणं हा मी माझा सन्मानच समजतो.” मंदाकिनी आणि तिच्या जिद्दीचे अभिनंदन करावे, तेवढे थोडेच!