मानवजातीच्या उत्कर्षात संगीताचा सर्वाधिक वाटा असल्याची नव्या आवृत्तीची संकल्पना; सर्व भेदभाव टाळून केवळ गुणांनाच मान्यता देणारे क्षेत्र काही कार्यक्रम लोकप्रिय होतात, काही कार्यक्रमांना एक मार्गदर्शकाचे स्थानही मिळते; परंतु एखादा कार्यक्रमाचे रुपांतर एखाद्या संस्थात्मक होण्याच्या घटना अगदी दुर्मिळ असतात. ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या संगीतविषयक रिअॅलिटीच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित कार्यक्रमाने हे दुर्मिळ स्थान प्राप्त केले असून टीव्हीवरील संगीत क्षेत्रातील गुणशोध स्पर्धेचा पायाच या कार्यक्रमाने घातला आहे. या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांत उभरत्या गायकांच्या पिढ्यांना आपले गायनकौशल्य जनतेसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच संगीताच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची दुर्मिळ संधी दिली होती. सोनू निगम, श्रेया घोषाल, शेखर रावजियानी, कुणाल गांजावाला, संजीवनी, रंजीत रजवाडा, कमाल खान असो की अमानत अली, यापैकी प्रत्येक जण संगीताच्या क्षेत्रात आज एक मान्यवर म्हणून प्रस्थापित झालेला असला, तरी ते आपल्या यशाचा पाया हा याच कार्यक्रमात घातला गेल्याचे मान्य करतात.
संगीतची ही पंढरीच आहे, असे त्यांचे मत आहे. आपल्या प्रत्येक आवृत्तीत या कार्यक्रमाने संगीताला नव्याने सादर केले असे नव्हे, तर निखळ, विशुध्द संगीताला रजमान्यता देण्यासाठी सा-या देशालाच एकत्र आणण्याचे काम त्याने केले आहे. गतवर्षीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘झी टीव्ही’ने आता आपला हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. संगीत हे सर्वांसाठी असते- म्युझिक से बने हम - ही या नव्या आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना असून संगीत हीच वैश्विक भाषा असून ती मानवाला एकमेकांशी जोडते आणि विकासाच्या मार्गवर नेते हा विचार त्यातून व्यक्त होतो. यातून सर्वसमावेशकत्वाचा खणखणीत संदेश दिला जात असून धर्म, भाषा, प्रांत, जात, वर्ण तसेच लिंग यापैकी कसलाही भेद संगीताला मान्य नसून ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम केवळ गुणवत्तेवरच आपले लक्ष केंद्रित करील, हेही त्यातून सूचित होते. ही संकल्पना या कार्यक्रमाच्या ‘हारेगा, हारेगा’ या नव्या जाहिरात मोहिमेत स्पष्ट होते. त्यात केवळ पराभूतच भेदभावाची सबब पुढे करतात आणि संगीत हे निव्वळ गुणवत्तेलाच मान्यता देते, असे दाखविण्यात आले आहे.
ह्याबद्दल सुशांत दिवगीकर म्हणाला, “सा रे ग म प चा हिस्सा बनताना मी खूपच उत्साहात आहे आणि माझी गायनकला लोकांसमोर सादर करण्यासाठी आणि रानी-को-ही-नूरच्या माध्यमातून ड्रॅगला एक परफॉर्मिंग आर्ट म्हणून मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी सा रे ग म प पेक्षा अधिक प्रतिष्ठित व्यासपीठ मला मिळू शकले नसते. माझ्याआधी टीव्हीवर ड्रॅग क्वीन झालेली नाही कारण मेनस्ट्रीम मनोरंजनामध्ये ड्रॅगचा कधी समावेशच केला गेला नाही. सुशांतच्या आवाजाच्या मदतीने मी राणीला पुढे आणेन. मला कळून चुकलं आहे की संगीत मला आनंदी बनवतं आणि मला हे सांगायला काहीही शरम वाटत नाही की मी टाळ्या मिळवण्यासाठी गातो. माझ्यासाठी हा शो जिंकणे दुय्यम असून मला माझ्या कलेने लोकांचे मन जिंकायचे आहे. काही लोकांबद्दल समजुती असणे साधारण आहे पण कलेने मानसिकता बदलणे शक्य आहे.”
कार्यक्रमातील एक परीक्षक सोना मोहपात्रा म्हणाली, “टीव्हीवरील संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम करण्याचा श्रीगणेशा मी सा रे ग म प या कार्यक्रमातून करणार असल्याने हा कार्यक्रम मला विशेष जवळचा वाटतो. भारतीय टीव्हीवरील गायनकलेचा शोध घेणारा हा एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम असून अशा कार्यक्रमाशी मी निगडित असल्याचा मला अभिमान वाटतो. तसंच इतक्या वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळाची सदस्य बनणारी मी पहिली महिला ठरले आहे. शिवाय सर्व सामाजिक-सांस्कृतिक भेद दूर सारून संगीतालाच वैश्विक भाषा म्हणून समजणार-या या नव्या आवृत्तीत माझा समावेश होत असल्याबद्दल मला विशेष अभिमान वाटतो. माझ्या सह-परीक्षकांबरोबरच ‘राष्ट्रीय संगीत पार्टी’ची मी प्रतिनिधी बनणार असून सर्व प्रकारच्या भेदभावाला दूर करून निखळ सांगीतिक गुणवत्तेला प्राधान्य देण्याची मागणीही करणार आहे. विविध धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, लिंगाच्या लोकांना एकत्र आणून केवळ संगीताच्या ताकदीनेच त्यांना एका सूत्रात बांधणं, हा या कार्यक्रमाचा आत्मा असेल. एक परीक्षक म्हणून मी स्पर्धकाचं संगीतावरील प्रेम, अस्सल आवाज आणि संगीत सादर करण्याची त्याची सफाई याकडे विशेष लक्ष देणार आहे.”
परीक्षक वाजिद खान म्हणाला, “गेल्या तीन आवृत्त्यांपासून मी ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाशी संबंधित असून आता आणखी एका नव्या आवृत्तीत परीक्षक म्हणून काम करण्यास मी उत्सुक बनलो आहे. देशभरातील होतकरू गायकांना आपल्या गायनकलेचं प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम हा कार्यक्रम करीत आहे. आजच्या पिढीच्या गायकांचे आवाज ऐकण्यास मी उत्सुक बनलो आहे. संगीत दर वर्षी उत्क्रांत होत असतं आणि म्हणूनच स्पर्धकांनी आपलं गायन कौशल्य आणि त्याचं सादरीकरण अधिक सफाईदार करण्याची गरज आहे. तसंच या कार्यक्रमाची यंदाची ही आवृत्ती सर्व प्रकारच्या भेदभावाच्या विरोधात असून संगीतानेच विश्वाला एकत्र बांधण्यावर त्याचा भर आहे. यंदाच्या आवृत्तीद्वारे आम्ही या स्पर्धेचा स्तर आणखी उंचावणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करू.”
परीक्षक शेखर रावजियानी म्हणाला, “हा कार्यक्रम मला अत्यंत प्रिय असून त्याच्या असंख्य आनंददायक आठवणी माझ्या मनात आहेत. अशा सुखद आठवणींमध्ये मी आता नवी भर टाकणार आहे. यातील स्पर्धकांचे- देशाच्या भावी गायकांचे आवाज ऐकण्यास मी उत्सुक झालो आहे. आतापर्यंत परीक्षण केलेल्या सर्व आवृत्त्या या धमाल होत्या. विशेषत: 2007 मधील आवृत्तीने तर इतिहसच घडविला. आता भारतीयांच्या संगीतप्रेमाला उत्तेजन देणा-या या कार्यक्रमाच्या या नव्या आवृत्तीशी निगडित होण्यास मी उत्सुक झालो आहे.”
मुंबई, दिल्ली, कोलकाता, रांची, गुवाहाटी, इटानगर, पाटणा, जयपूर, अमृतसर, चंदिगड, लखनौ, बंगळुरू, इंदौर आणि अहमदाबाद यासारख्या अनेक शहरांतून या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स होत असून त्यामुळे देशभरातील उत्कृष्ट गायकांची निवड करण्यात या कार्यक्रमाने कोणतेही प्रयत्न कमी केलेले नाहीत, हे दिसून येते. या कार्यक्रमाच्या नामवंत परीक्षक मंडळापुढे आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि संगीताच्या आपल्या छंदाला देशापुढे सादर करण्याची सुवर्ण संधी यातील स्पर्धकांना लाभणार आहे.