झी टीव्हीवरील लहान मुलांचा लोकप्रिय संगीत रिॲलिटी शो सा रे ग म प लिटल चॅम्प्सने आपल्या श्रवणीय आणि सुमधूर संगीतासह सर्वांना आपापल्या खुर्चीला अक्षरशः खिळवून ठेवले आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत असून या सगळ्यांमधून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. नेपाळच्या ११ वर्षीय प्रितमने तर प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडकरांचे देखील मन जिंकले आहे. सुनील शेट्टी, रितेश देशमुख आणि अर्जुन कपूर यांच्याकडून या चिमुकल्याने वाहवासुद्धा मिळवली आहे. बॉर्डर चित्रपटातील संदेसे आते है हे गाणे त्याने नुकतेच खूपच छान प्रकारे सादर केले.
प्रितमचा हा अफलातून परफॉर्मन्स सर्वांनाच आवडला आणि या परफॉर्मन्सनंतर ट्वीटरवर कौतुकाचा पाऊस पडला. हे गाणे सनी देओल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले आहे. या गाण्यामध्ये दिसून आलेल्या सुनील शेट्टीने ट्वीट केले आहे की, BREATHTAKING! Power of the film, music and the talent of this young boy #Pritam Acharya
अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या टोटल धमाल या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या मंचाला भेट दिली होती. त्याने प्रितमसाठी ट्वीट केले आहे की, Incredible-heard him live-simply fantastic... Pritam Acharya.
अभिनेता अर्जुन कपूरनेही प्रितमचे ट्वीट करून कौतुक केले आहे. त्याने ट्वीट मध्ये लिहिले आहे की, “This song describes the emotion of the nation today as we know it”
एवढेच नाही तर परीक्षक शानने सुनील शेट्टीचे प्रितमचा उत्साह वाढवल्याबद्दल आभार मानले असून त्यावर सुनीलने प्रतिक्रिया दिली आहे. Bravo to you Team Zee for giving us unbelievable Li’l Champs year after year.
आपल्या संगीताने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रितम आचार्यचे यामुळे सगळेच अभिनंदन करत आहे. ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता झी टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळतो.