Join us

"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 1:13 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता महात्मा गांधींबद्दल एक खास पोस्ट केली आहे (sachin goswami)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे सध्या चर्चेत असतात. सचिन गोस्वामी यांनी आजवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाशिवाय 'फू बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'कॉमेडी एक्सप्रेस' अशा विविध कॉमेडी शोच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सचिन गोस्वामी सोशल मीडियावर सध्याच्या राजकीय सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. सचिन गोस्वामी बऱ्याचदा समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे व्यक्त होतात. यामध्येच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर त्यांचं मत मांडलं आहे. सचिन गोस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता एक पोस्ट शेअर केली आहे.

सचिन गोस्वामींची पोस्ट

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची देशभरात चर्चा झाली. अनेकांनी सोशल मीडियावर या संबंधित पोस्टही शेअर केल्या. यामध्येच आता सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेल्या पोस्टकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर दोन पोस्ट लिहिल्या आहेत. त्यापैकी पहिल्या पोस्टमध्ये गोस्वामी लिहितात, "गांधी जगाला आधीच कळले होते.. भारतातील काहींना ते सिनेमानंतर कळले.." पुढे गोस्वामींनी दुसरी पोस्ट लिहिली आहे की, "अज्ञान फुकाचा कॉन्फिडन्स देतं.. आणि ज्ञान संयम ..." सचिन गोस्वामींनी लिहिलेल्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टखाली अनेकांनी गोस्वामींच्या म्हणण्याला समर्थन दिलेलं दिसतंय. 

म. गांधीविषयी नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

ABP वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींबद्दल मोठं वक्तव्य केलं ज्यामुळे वाद निर्माण झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "महात्मा गांधी एक महान व्यक्ती होते. पण गेल्या ७५ वर्षात महात्मा गांधी यांना जगाने ओळखावं ही आपली जबाबदारी नव्हती का? मला माफ करा पण त्यांना कोणीही ओळखत नाही. पहिल्यांदा महात्मा गांधी चित्रपट तयार झाला तेव्हा जगभरात गांधी कोण आहेत? याबाबत कुतूहल निर्माण झालं. आपण हे केलं नाही. हे देशाचं काम होतं." 

टॅग्स :नरेंद्र मोदीभाजपाभारतमहात्मा गांधीमहाराष्ट्राची हास्य जत्रा