Join us

पोस्टमन काका बनून सागर कारंडे परतला; 'चला हवा येऊ द्या' नाही तर 'या' कार्यक्रमात घेतली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 6:02 PM

अखेर सागरने छोट्या पडद्यावर मोठ्या थाटात एन्ट्री घेतली आहे. 

सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे की, प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमध्ये सागर करत असलेल्या विविधांगी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. स्त्रीपात्र असो वा पोस्टमनसारखं भावुक करणारं पात्र सागरने तितक्याच ताकदीने हुबेहूब उभं केलं. पण, गेल्या काही दिवसांपासून सागर पडद्यापासून दूर होता. अखेर सागरने छोट्या पडद्यावर मोठ्या थाटात एन्ट्री घेतली आहे. 

सागरने हार्दिक जोशीच्या 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमात  'पोस्टमन काका' बनून एन्ट्री घेतली. झी मराठी इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये सागर पोस्टमन बनून घरातील सदस्यांना भावुक करताना पाहायला मिळत आहे.  'जाऊ बाई गावात' कार्यक्रमातील स्पर्धकांचे पत्र तो घेऊन आला आहे.

इतक्या दिवसांनी सागरला पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत. सागर हा 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचे प्रयोग करत होता. शिवाय तो मधल्या काळात आजारीही होता. तेव्हा अनेकांनी त्यांच्या प्रकृती बाबत मोठी काळजी व्यक्त केली होती. आता पुन्हा पोस्टमनच्या रुपात तो प्रेक्षकांसमोर आला आहे. लाडक्या पोस्टमन काकांच्या रूपात सागर कारंडेच्या अनोख्या प्रतिभेचा प्रेक्षकांंना पुन्हा एकदा आनंद घेता येणार आहे. 

छोट्या पडद्यावर अलिकडेच 'जाऊ बाई गावात' हा कार्यक्रम सुरु झाला आहे. हटके कन्सेप्ट आणि स्पर्धकांना देण्यात येणार टास्क यांच्यामुळे हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाचं अभिनेता हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत आहे. हार्दिक ही जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही त्याला चांगली दाद मिळताना दिसत आहे.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजनचला हवा येऊ द्या