छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि गाजलेली मालिका 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या अडचणीत आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर आणि सहकलाकारांवर गंभीर आरोप केले आहेत. मालिकेच्या सेटवर मानसिक त्रास दिल्याचं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अन्नपूर्णा विठ्ठल या मालिकेत सूर्या या मुख्य पात्राच्या आईची भूमिका साकारत आहेत.
अन्नपूर्णा विठ्ठल यांनी शेअर केला व्हिडीओ हिंदीमध्ये असून मालिकेच्या सेटवर माझं वारंवार रॅगिंग करण्यात आलं असं त्यांनी म्हटलं आहे. "मराठी कलाविश्वात अमराठी कलाकारांना टिकू दिलं जात नाही. मी गेल्या काही महिन्यांपूर्वीच सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. परंतु, मला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशी अफवा पसरवली गेली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रँगिंग करणे अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. माझं रॅगिंग करण्यात सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारखे अनेक कलाकार सहभागी होते. त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,” असं अन्नपूर्णा यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
पुढे त्या म्हणतात, “मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का? मग जर हिंदी, तेलुगू कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये अशी तुमची मानसिकता असेल तर मग, अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगू कलाविश्वातही काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे".
दिग्दर्शकांवरही केले गंभीर आरोप
मालिकेचे दिग्दर्शक भरत गायकवाड हे कायम मला म्हातारी म्हणून हाक मारायचे तसंच सेटवरही अश्लील शिवीगाळ करायचे. इतकंच नाही तर नंदिता पाटकर यांनी मला खोलीतून बाहेर काढण्याचा कट रचला होता. नंदिता टॉयलेटदेखील अस्वच्छ ठेवत होती. मला या मालिकेदरम्यान इतका त्रास दिला की मी डिप्रेशनमध्ये गेले. अनेकदा मला धमक्या देण्यात आल्या. मला अभिनय येत नाही, उद्यापासून हिच्यासाठी संवाद लिहू नका. सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण टीमने एका आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड त्रास दिला आहे. त्यांचे कधीही चांगले होणार नाही,” असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.
दरम्यान, अन्नपूर्णा विठ्ठल यांनी २२ नोव्हेंबर रोजी दादर पोलीस ठाण्यात मालिकेच्या निर्मात्यांविरोधात मानसिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. अन्नपूर्णा गेल्या एक वर्षापासून ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मराठी मालिका करत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे