छोट्या पडद्यावरील 'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar) या मालिकेत सध्या मोरे कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सरिता लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती तिच्या येणाऱ्या बाळाची स्वप्न रंगवत आहे. परंतु, या आनंदाच्या भरात तिचं अवनीच्या बाळाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सुर्या तिच्यावर संतापला आहे. मात्र, सरिताने बाळाकडे दुर्लक्ष का केलं या मागचं कारण ती लवकरच सूर्याला सांगणार आहे. सोबतच ती आई होणार असल्याची कबुलीदेखील देणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सरिता मंदिरात देवासमोर सूर्याला ती आई होणार असल्याचं सांगते. इतंकच नाही तर ही आनंदाची बातमी ऐकून सूर्यादेखील भलताच खूश झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सरिताला मूल होत नसल्यामुळे अवनी तिच्या बाळाची जबाबदारी सरुवर सोपवते. सुरुवातीचे काही दिवस सरु या बाळाची व्यवस्थित काळजी घेते. परंतु, सरिता आई होणार असल्यामुळे तिला वरचेवर काही किरकोळ शारीरिक तक्रारी उद्भवतात. त्यामुळे सरिता मुद्दाम अवनीच्या बाळाचा सांभाळ करण्यास टाळते. परंतु, तिचं हे वागणं पाहून घरातील सगळे जण नाराज होतात.अगदी सूर्यादेखील तिच्यावर चिडतो.
दरम्यान, सूर्या चिडल्यावर सरिता तिच्या अशा वागण्यामागील कारण सांगते. विशेष म्हणजे सरिताची ही गोड बातमी ऐकल्यावर सूर्यादेखील आनंदी होतो. त्यामुळेच सरिता तिच्या प्रेग्नंसीविषयी अवनी आणि घरातील इतरांना सांगणार का? त्याचा घरातल्यांवर काय परिणाम होईल? आता मालिकेत कोणतं वळण येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.