'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. एकत्र कुटुंब, एकमेकांविषयी असलेलं प्रेम, आपुलकी या मालिकेत उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे. त्यामुळे ही मालिका विशेष लोकप्रिय आहे. सध्या या मालिकेत मोरे कुटुंबात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्योती या घरात आल्यापासून सातत्याने सूर्याचं मन जिंकायचा प्रयत्न करतीये. इतकंच नाही तर आता आमच्यामध्ये येऊ नको, असंही ती सरिताला सांगते. यावर संतापलेल्या सरिताने कोणताही विचार न करता तिच्या कानशिलात लगावली. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवं वळण आलं आहे.
काही दिवसांपासून मोरे कुटुंबापासून लांब राहत असलेली सरिता आता घरी परतली आहे. मात्र, सरिताच्या गैरहजेरीत ज्योतीने या घरावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर सूर्याच्या मनात खास जागा मिळावी यासाठीही ती प्रयत्न करत होती. मात्र, सरिता घरी परतल्यानंतर तिने ज्योतीचा डाव उधळून लावण्यास सुरुवात केली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये "उगाच खोट्या आशेवर राहू नकोस तू. मी आणि सूर्या आमच्या नात्यात खूप पुढे गेलो आहोत", असं ज्योती सरिताला सांगते. हे वाक्य सूर्या ऐकतो आणि चांगलाच संतापतो. आणि, "या घरात पुरुष माणूस बाईचा आदर करतो म्हणून तू वाचलीस नाही", असं सूर्या म्हणतो. यावर "ते तुला शिक्षा देऊ नाही शकले पण मी देऊ शकते की", असं म्हणत सरिता ज्योतीच्या कानशिलात लागवते.
दरम्यान, सरिता आता ज्योतीला तिची जागा दाखवून देणार आहे. इतकंच नाही तर मोरे कुटुंबातून तिची हकालपट्टी करण्यासाठीही संपूर्ण कुटुंब एकत्र येणार आहे. त्यामुळे या घरातून ज्योती कशी बाहेर जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.