Join us

सई देवधरचं तब्बल ५ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'दबंगी-मुलगी आई रे आई' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 4:44 PM

Sai Deodhar : दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेत आर्या या एका चुणचुणीत आणि निडर मुलीचा परिचय प्रेक्षकांना करून देणार आहे. या मालिकेत आर्याची आई छायाच्या भूमिकेत अभिनेत्री सई देवधर पाहायला मिळत आहे. या मालिकेतून ती तब्बल ५ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई (Dabangi Mulgi Aai Re Aai) मालिकेत आर्या या एका चुणचुणीत आणि निडर मुलीचा परिचय प्रेक्षकांना करून देणार आहे. ही मनोरंजक मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित होणार आहे. आपल्या वडीलांना भेटण्यासाठी आसूसलेल्या, त्यांचा शोध घेणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवले. या मालिकेत आर्याची आई छायाच्या भूमिकेत अभिनेत्री सई देवधर (Sai Deodhar) पाहायला मिळत आहे. या मालिकेतून ती तब्बल ५ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. 

याबद्दल सई देवधर म्हणाली की, मी टीव्ही उद्योगातून ५ वर्षे विश्रांती घेतली होती, कारण मला रुचतील, पटतील अशा भूमिका मला मिळत नव्हत्या. त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या मागे राहून निर्मितीचे काम करणे पसंत केले. पण, मला पुन्हा पडद्यावर येण्याची नक्कीच इच्छा होती, कारण टीव्ही या माध्यमाशी असलेले नाते मला कायम ठेवायचे होते. जेव्हा दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेचा प्रस्ताव  मला मिळाला, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, “मला कळत नाहीये” कारण मला नकळत ‘नाही’ म्हणण्याची सवय लागली होती. पण त्यांनी कथानक ऐकण्याचा आणि छाया या व्यक्तिरेखेविषयी समजून घेण्याचा मला आग्रह केला. जेव्हा मी कहाणी ऐकली आणि माझी भूमिका जाणून घेतली तेव्हा मला वाटले, की ही भूमिका हातून जाऊ देता कामा नये. मला हा विषय आवडला, त्यातील थरार, नाट्य, साहस आणि आई व मुलीचे गोड नाते आवडले. एका मुलीला आपल्या वडिलांना भेटण्याची किती प्रचंड इच्छा आहे, ते भावले. शिवाय, यामध्ये दाखवलेले दोन भिन्न विचारसरणी असलेल्या भावांचे नाते मनाची पकड घेणारे आहे. कथानकातील या गोष्टींनी मी आकर्षित झाले, पण यातील आई आणि मुलीच्या गोड नात्याने मला सकारात्मक निर्णय घेण्यास मदत केली.

ती पुढे म्हणाली की,  एक पिता आणि त्याच्या मुळीभोवती फिरणारी ही गोष्ट आहे. विरुद्ध विचारसरणी, ध्यास, ताकद, स्वाभिमान आणि रक्ताच्या नात्यांची ही गोष्ट आहे. अशा प्रकरचा कंटेंट पूर्वी बनत नसे. मला वाटते ‘दबंगी’ हे चांगला कंटेंट आणि मोठ्या समूहास आकर्षित करण्याची ताकद यांचे उत्तम उदाहरण आहे.