सोनी मराठी या वाहिनीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या वाहिनीवरील कॉमेडी शो 'हास्यजत्रे'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात सादर होणाऱ्या स्कीटमधून प्रेक्षकांना विनोदाची पूरेपूर मेजवानी मिळते आहे. या कार्यक्रमातील परीक्षक सई ताम्हणकर हिने या कार्यक्रमाच्या मंचावर आपल्या आईला अनोखे सरप्राईज दिले आहे.
मुंबई म्हणजे कामात व्यस्त असणारे शहर... या कामाच्या व्याप्यात आपली माणसे बऱ्याचदा दुरावतात... आपल्या सेलिब्रिटीजच्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच घडते. राहत्या ठिकाणाहून या मायानगरीत येऊन, आपले स्थान निर्माण करायचे आणि त्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी धडपड करायची. या सगळ्यात आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती म्हणजे आपले आई-बाबा यांच्यासाठी वेळ काढणे कठीण होऊन बसते. मात्र आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या आई-बाबांचे आपल्या आयुष्यातले स्थान साजरे करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी ही पुरेशा असतात, हे सोनी मराठीवर सुरू असलेल्या हास्यजत्रेची परीक्षक आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पटवून दिले आहे.'हास्यजत्रे'च्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरने वेळात वेळ काढून आपल्या आईच्या वाढदिवशी तिला बोलावून या मंचावर केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्या माऊलीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद वेगळाच होता. सई बरोबरच हास्यजत्रेचे दुसरे परीक्षक प्रसाद ओक, सूत्रसंचालक प्राजक्ता माळी तर समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे - संभेराव, प्रसाद खांडेकर तसेच या शोची संपूर्ण टीम उपस्थिती होती.