या मालिकेद्वारे सैफ अली खान करणार छोट्या पडद्यावर पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:30 AM2019-05-09T06:30:00+5:302019-05-09T06:30:02+5:30
सैफने सेक्रेड गेम्स द्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
सैफ अली खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहता है, ओमकारा यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिकांचे कौतुक होत आहे. त्याने सेक्रेड गेम्स द्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पण तो कोणत्याही मालिकेत काम करत नसून एका मालिकेत तो सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
संदीप सिकंदनिर्मित ‘कहाँ हम, कहाँ तुम’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोसाठी बॉलिवूडचा नबाब सैफ अली खानने नुकतेच चित्रीकरण केले. या प्रोमोमध्ये ‘कहाँ हम, कहाँ तुम’ या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांची ओळख सैफ प्रेक्षकांना करून देणार आहे. ‘कहाँ हम, कहाँ तुम’ या मालिकेच्या प्रोमोसाठी त्याने नुकतेच चित्रीकरण मुंबईत केले. या मालिकेत अनेक नामवंत कलाकार भूमिका साकारत असून त्यात दीपिका कक्कर आणि करण व्ही. ग्रोव्हर या कलाकारांचा समावेश आहे. अगदीच भिन्न स्वभाव असलेल्या एका दाम्पत्याची कथा संदीप सिकंद या मालिकेतून सादर करणार आहेत. सैफ अली हा या मालिकेचा सूत्रधार असून त्याचा हा अंदाज त्याच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे.
‘कहाँ हम, कहाँ तुम’ या मालिकेत दीपिका कक्कर टीव्हीवरील एका अभिनेत्रीची भूमिका साकारणार असून करण हा हृदयरोगतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा भाग व्हायला सैफ अली खूपच उत्सुक होता. त्याने सांगितले, “एका अगदी वेगळ्या विषयावरील परंतु सहज पटण्याजोग्या संकल्पनेवर आधारित अशी ही मालिका आहे. या मालिकेचा भाग बनल्याचा मला खूप आनंद होत आहे. आजच्या अतिशय धावपळीच्या जीवनात आपल्याला रात्री एकत्र जेवायला बाहेर जायचं असेल, तरी त्याचं नियोजन करणं अवघड होऊन बसतं. या मालिकेतील व्यक्तिरेखा मला लगेचच पटल्या, हे या मालिकेशी मी जोडला जाण्याचं मुख्य कारण आहे. केवळ सदैव कामातच व्यग्र राहणं हे चांगलं नसून तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसाठीही वेळ काढता आला पाहिजे; तरच आपलं जीवन सुंदर होईल.”