आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रणौतचा 'लॉक अप' (lock upp) हा शो काही दिवसांपूर्वीच सुरु झाला आहे. विशेष म्हणजे हा शो सुरु झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. खासकरुन कॉन्ट्रोवर्सीजमुळे चर्चेत आलेल्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कलाकारांची एक वेगळी बाजूही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यामध्येच एका स्पर्धकाने तिला बॉयफ्रेंडने कशा प्रकारे तिचा मानसिक छळ केला हे सांगितलं.
सायशा शिंदे हे नाव सध्या कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. प्रसिद्ध ट्रान्सवूमन फॅशन डिझायनर म्हणून सायशा आज ओळखली जाते. याच सायशाने लॉक अपमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी कैद झाल्यानंतर तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला कशाप्रकारे त्रास दिला हे सांगितलं.
काय म्हणाली सायशा?
लेटेस्ट एपिसोडमध्ये पायल रोहतगी, सायशा शिंदे आणि पूनम पांडे त्यांच्या रिलेशनशीपविषयी चर्चा करत होत्या. यावेळी पूनमला तिच्या नवऱ्याने सॅम बॉम्बेने कशी मारहाण केली हे सांगितलं. त्यानंतर सायशानेही तिची स्टोरी सांगितली.
"रिलेशनशीपमध्ये असताना मलादेखील बराच मानसिक त्रास,छळ सहन करावा लागला आहे. माझा कधी शारीरिक छळ झाला नाही. पण, मानसिक छळ प्रचंड झाला. तो छळ काही वेगळाच होता ज्यामुळे मला फार त्रास झाला. तो मला सतत लाजिरवाणं वाटावं असंच कृत्य करायचा. तो माझ्या दरवाजाबाहेर उभा राहायचा आणि माझ्या घरातून कोणी तरी बाहेर येईल याची वाट पाहायचा. त्याला वाटायचं माझं इतर ठिकाणी अफेअर्स आहेत. त्यामुळे संशयापोटी तो माझ्या दरवाजाबाहेर उभा राहायचा. पण, त्याचे हे प्रयत्न कधीच यशस्वी झाले नाहीत", असं सायशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "पाईपलाइनच्या मदतीने तो घराच्या गच्चीवर जायचा आणि तिथे उभा रहायचा. इतकंच नाही तर तो बाथरुमच्या खिडक्या उघडून त्यातून लपून लपून घरात डोकवायचा."
कोण आहे सायशा शिंदे?
सायशा शिंदे एक ट्रान्सवूमन फॅशन डिझायनर आहे. आजवर तिने कंगना रणौत, करीना कपूर खान, हिना खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटीचा मेकओव्हर केला आहे. तसंच मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाज संधूचा ड्रेसही तिनेच डिझाइन केला होता. सायशा ट्रान्सवूमन होण्यापूर्वी स्वप्नील शिंदे या नावाने ओळखली जायची.