एखादी मालिका लोकप्रिय होऊ लागली, की मालिकेचे १०० भाग पूर्ण होणे, हा यशाचा पहिला मोठा टप्पा असतो. यशाकडे सुरू झालेली ही वाटचाल नेहमी साजरी केली जाते. 'साजणा' या मालिकेने यशाचा हा पहिला टप्पा नुकताच गाठला आहे. निर्मळ प्रेमकहाणी असलेली ही रमा आणि प्रताप यांची कथा, लोकप्रियतेच्या एका वेगळ्या उंचीवर पोचली आहे. अभिजित श्वेतचंद्र आणि पूजा बिरारी यांचा सहजसुंदर अभिनय, खेडेगावातील संस्कृती आणि तिथली आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ; याच्या जोरावर मालिकेने हा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यात मालिका यशस्वी ठरली आहे.
हे यश मालिकेच्या सेटवर साजरं करणं, हे ओघाने आलंच. संपूर्ण टीमच्या उपस्थितीत केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक सदस्याने एकमेकांचे अभिनंदन केले. या यशात सर्वांचाच मोठा वाटा आहे. या मालिकेने आपल्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांकडून कौतुक होत असल्याचं आणि अमाप प्रेम मिळत असल्याचं, कलाकार अगदी आवर्जून सांगतात. मालिकेच्या सेटवर या यशाचा आनंद द्विगुणित झाला, तो अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या वाढदिवसामुळे. तिच्यासाठी एक अनोखी भेट, म्हणून तिच्या आई-वडिलांना सुद्धा सेटवर बोलावण्यात आलं होतं. मालिकेतील कलाकारांकडून सुद्धा पूजाला मिळत असलेलं कुटुंबाचं प्रेम बघून, तिचे वडीलदेखील भारावून गेले. मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना पूजा म्हणाली; "साजणा मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला यात प्रेक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.
सुरुवातीपासूनच त्यांचं प्रेम आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्य आहे. पडद्यामागचे कलाकार हे नेहमीच अशा यशात फार मोठा वाटा उचलत असतात. त्यामुळे आनंद साजरा करत असतांना, त्यांना यात सहभागी करून घेणं, ही त्यांच्या कामाला मिळणारी खरी पोचपावती असते. मालिकेच्या यशाचा पहिला टप्पा साजरा केला जात असतांना, माझा वाढदिवस सुद्धा सेटवर साजरा झाला असल्याने, हा दिवस आणखी आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरणार आहे."