‘बिग बॉस मराठी 2’ हा छोट्या पडद्यावरचा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकांना आज (11ऑगस्ट) विकेंडच्या डावात एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर भाईजान सलमान खान. कालच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकरांनी या सरप्राईजबद्दलची हिंट सदस्यांना सांगितले होते. त्यानुसार, आजच्या विकेंडच्या डावात महेश मांजरेकरांसोबत सलमान खान ‘बिग बॉस मराठी 2’च्या सेटवर हजेरी लावणार आहे. पण खास गोष्ट म्हणजे, हा सलमान ‘बिग बॉस’च्या घरातीलच्या एका प्रेमात पडला आहे. हा सदस्य कोण तर अभिजीत बिचुकले.
होय, अभिजीत बिचुकले यांनी सुरुवातीपासून आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने बिग बॉसच्या घरात अपार लोकप्रियता मिळवली. त्यांची भांडणे, त्यांच्या कविता, त्यांची स्टाईल सगळेच लोकप्रिय झाले. आता खुद्द भाईजानही बिचुकलेंच्या या स्टाईलचा ‘दिवाना’ झाला आहे. त्याचमुळे बिचुकलेंना बिग बॉस हिंदीमध्ये पाठवा, असे सलमानने म्हटले आहे. अर्थात त्याच्या इच्छेनुसार, अभिजीत बिचुकले खरोखरच हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का, या प्रश्नाचे उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे.