Sana Maqbool Disease: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल कामय चर्चेत असते. 'बिग बॉस ओटीटी ३' जिंकल्यापासून ती प्रचंड व्यस्त आहे. विविध प्रोजेक्टवर तिचं काम सुरू आहे. सनाचा चाहतावर्ग खूप मोठा असून सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच सना मकबूल ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच सना मकबूल हिने एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने आरोग्याबद्दल काही हैराण करणारे खुलासे देखील केले.
सना मकबूल ही गंभीर आजाराने ग्रस्त आहे. 'ऑटोइम्यून हिपॅटायटीस' नावाचा हा एक यकृताचा गंभीर आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही यकृतावर हल्ला करते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. सनाला २०२० मध्ये हा आजार आपल्याला झाल्याचं तिला कळालं होतं. अलीकडेच सना भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल बोलताना दिसली. ती म्हणाली, "माझ्या शरीरातील पेशी माझ्या स्वतःच्या यकृतावर हल्ला करत आहेत. याचा किडनीवरही परिणाम होतो. त्यामुळे सांधेदुखीची समस्याही उद्भवते".
सना मकबूल म्हणाली, "या आजाराशी लढण्यासाठी अनेक औषधांची मदत घ्यावी लागते. मी स्टिरॉइड्स आणि इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेते. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, की नाही याबद्दल डॉक्टरांचे मत स्पष्ट नाही. माझी तब्येत सतत बदलत राहते, कधीकधी मला बरं वाटतं तर कधीकधी मला खूप अशक्तपणा जाणवतो". या आजारमुळेच शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं. एवढ्या गंभीर आजारासमोरही सना झुकलेली नाही, तिनं आपलं काम थांबवलेलं नाही. बिग बॉस जिंकल्यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अलिकडेच तिनं 'बिग बॉस १८'चा विजेता करणवीर मेहरासोबत एक म्युझिक व्हिडिओ केला होता.