Join us

‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून पदार्पण करणारी ‘ही’ अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कवीची लेक; वाचा, तिच्या बाबाची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:01 IST

Tu Teva Tashi : झी मराठी या वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ ही  नवी कोरी मालिका कालपासून सुरू झाली. सध्या तरी या मालिकेची चांगलीच चर्चा आहे...

झी मराठी या वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’  ( Tu Teva Tashi) ही नवी कोरी मालिका कालपासून सुरू झाली. सध्या तरी या मालिकेची चांगलीच चर्चा आहे. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आलीये. शिवाय या मालिकेतून एक नवा चेहरा टेलिव्हिजन विश्वात प्रवेश करतोय. होय, एका दिग्गज कवीची लेक या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करतेय. तिचं नाव काय तर रूमानी खरे (Rumani Khare) .

रूमानी कोण तर प्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) यांची लेक. संदीप खरे यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या जोडीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली. या गोड जोडीतील संदीप खरे यांची लेक रूमानी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.खुद्द संदीप खरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेक रुमानी   छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे.

‘लाडकी लेक रूमानी आज टीव्हीवर पदार्पण करतेय, एका छान भूमिकेतून. आजपासून सुरु होत असलेल्या एका नव्या मराठी मालिकेतून.  तू तेव्हा तशी  झी मराठी वर आज रात्री ८ वाजता. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिच्याही पाठीशी सदैव राहू देत, हीच प्रार्थना..., अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

याआधी 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्रीरंग गोडबोले’ दिग्दर्शित  चिंटू  आणि 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या  चिंटू 2  या चित्रपटांमध्ये रुमानी दिसली होती. बालकलाकार म्हणून तिने काम केलं होतं. 2019 मध्ये ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रूमानीला अभिनयासोबतच तिला डान्सचीही आवड आहे. रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेबद्दल सांगायचं झाल्यास, या मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्री अभिज्ञा भावे सुद्धा  पुष्पावल्लीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

टॅग्स :संदीप खरेझी मराठीस्वप्निल जोशीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार