नाशिक : येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाच्या विद्यार्थिनींनी अल्प खर्चात आणि नियमित वापरात असणाऱ्या उपकरणांच्या साह्याने एक लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीन तयार केले आहे.रोजच्या उपकरणांमध्ये दिसणाºया माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्य वापरून बनविलेल्या या मशीनमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे. नेहमीच्या वापरातील मोबाइल चार्जरच्या मदतीने हे मशीन चार्ज होते मशीनला बसविलेल्या तोटीसमोर हात नेले की हातावर सॅनिटायझर आपोआप पडेल अशा पद्धतीची मशीनची रचना आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक आर. एस. मानकर यांच्यासमोर मशीनचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य माधुरी भामरे, गट निदेशक मोहन तेलंगी, विवेक रनाळकर उपस्थित होते. यासाठी विद्यार्थिनींना शिल्पनिदेशक संजय म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. अवघ्या तीन दिवसांत हे मशीन तयार करण्यात आले आहे.कोट : विद्यार्थिनींना काहीतरी नावीन्यपूर्ण आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल अशा निर्मितीचा विचार करून या मशीनची निर्मिती केली आहे. आज हँड सॅनिटायझरची सर्वत्र गरज असून, कोठेही सहज उपयोगात येईल यापद्धतीने हे यंत्र निर्माण केले असून पूर्णत: सुरक्षित आहे - संजय म्हस्के, शिल्पनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) नाशिक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी बनविले सॅनिटायझर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 4:59 PM