छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला शो 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. एकीकडे या कार्यक्रमाने १० वर्ष पूर्ण केली आहेत. तर, दुसरीकडे शोमधून निलेश साबळे, कुशल बद्रिके (kushal badrike) आणि श्रेया बुगडे (shreya bugade) या कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. यामध्येच आता निलेश साबळेच्या जागी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan-karhade) या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी संकर्षणने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश साबळे (dr. nilesh sable) या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर आता संकर्षण या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतंकच नाही तर सोशल मीडियावर तशी चर्चाही रंगली आहे. यामध्येच संकर्षणने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने चला हवा येऊ द्याचं सूत्रसंचालन करण्याविषयी भाष्य केलं.
काय म्हणाला संकर्षण?
"माझा मित्र डॉ. निलेश साबळे याची ही जागा आहे. निलेश साबळे हाच या कार्यक्रमाचा सूत्रधार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्यामुळे निलेशची जागा आमच्यापैकी कोणीच घेऊ शकत नाही. मी या कार्यक्रमाचा पाहुणा निवदेक आहे. मध्यंतरी जेव्हा मी या कार्यक्रमात आलो होतो तेव्हा चला हवा येऊ द्याला १० वर्ष पूर्ण झाली होती.आणि, आता हा कार्यक्रम काही काळासाठी निरोप घेत आहे. त्यामुळे त्या निरोप समारंभासाठी मी पाहुणा निवेदक म्हणून आलो आहे", असं संकर्षण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मी या कार्यक्रमाचा पूर्णवेळ निवेदक नाही आणि मनापासून माझी तशी इच्छाही नाही. याचं कारण म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम म्हटलं की निलेश साबळे हाच निवेदक आपल्याला दिसतो. त्याची या कार्यक्रमाची वेगळी जागा आहे आणि ती त्याने पक्की केली आहे."
दरम्यान, संकर्षणने 'चला हवा येऊद्या'चा कायमस्वरुपी सूत्रसंचालन करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तात्पुरत्या काळासाठी त्याची या कार्यक्रमात एन्ट्री झाली असून तो लवकरच सुरू होणाऱ्या 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांच्या कलाकारांशी CHYD मधून गप्पा मारणार आहे.