सध्या संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागून राहिलं आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता संकर्षण कऱ्हाडेने विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुचक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून संकर्षणची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
संकर्षण हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो व्यक्त होताना दिसतो. आतादेखील संकर्षणने पोस्टमधून त्याचं मत व्यक्त केलं आहे. हत्तीच्या पुतळ्याबरोबरचा एक सेल्फी संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तो म्हणतो, "आजचा निकाल ह्या फोटोत आहे...हत्तीच्या मनात काही वेगळंच होतं, पण घंटा तसं काही झालं नाही...असो...". संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
याआधीही संकर्षणने त्याच्या कवितेच्या माधम्यातून राज्यातील राजकारण आणि निवडणुकीवरही भाष्य केलं होतं. दरम्यान, सध्या संकर्षणचे नाटकाचे दौरे सुरू आहेत. तू म्हणशील तसं, नियम व अटी लागू ही नाटके आणि संकर्षण via स्पृहा या कलाकृतीतून संकर्षण प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.