Join us  

Sankarshan Karhade : शाळेच्या शिक्षिका भेटल्या अन् संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:21 AM

संकर्षण कऱ्हाडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. नुकतंच त्याच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

संकर्षण कऱ्हाडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं, 'माझ्या शाळेच्या मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो…' माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या. नेहमी मला वर्गात ऊठवायच्या आणि कऱ्हाडे  धडा वाच...कऱ्हाडे, अक्षर अतीशय घाण आहे. तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार...? असं म्हणायच्या…पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमीच आलेला असायचा) की, 'कऱ्हाडे … गाणं म्हण' असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं. मला खूप भरून आलं'. 

पुढे त्याने लिहलं, 'प्रेक्षकांना भेटताना तसा मी शांत ऊभा असतो पण, बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली. माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल” तर ती बाईंनीच करून दिलीये. हे नातं तेव्हाचं आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना 'बाईच' म्हणायचो. समजा शाळेतले गुरूजी...भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो. अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो. त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाऊन आई बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही. पण आज सांगतो आई बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही की 'माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं'. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

संकर्षण अत्यंत साधा असून तो प्रेक्षकांसमोरही तितक्याच साधेपणाने वावरतो. त्यामुळे लोकप्रिय अभिनेता असूनही तो कधीच त्याचा स्टारडम प्रेक्षकांसमोर दाखवत नाही. त्याच्या याच साधेपणामुळे तो चाहत्यांना आपलासा वाटतो.  संकर्षण  त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचांर करायला भाग पाडतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसामाजिकसोशल मीडियामराठी चित्रपटशाळा