हरयाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सपना चौधरीचा जन्म 25 सप्टेंबर 1990 रोजी दिल्लीच्या महिपालपूरमध्ये झाला. आपला नृत्यामुळे ती केवळ हरयाणामध्येच नाही तर इतर राज्यांतही प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्येही सपना चौधरीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तिच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं लोक जमतात. तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या डान्स स्टाइलमुळे सपनाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच बिग बॉस या कार्यक्रमातही तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सपना चौधरी १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. अशा परिस्थितीत आर्थिक विवंचनेमुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. यामुळे त्यांना घरही गहाण ठेवावं लागलं. हळूहळू संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सपनावर आली. अशा परिस्थितीत त्यांनी कला आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले आणि तिला यात यश मिळत गेलं.
डान्समुळे ती जगभरात ओळखली जाते. देशासह विदेशात डान्स शो करणारी सपना एका स्टेज शोसाठी प्रचंड मोठं मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. आज सपना चौधरीला संपूर्ण देशात कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. हरयाणातील स्टेज शोमधून तिनं करिअरची सुरुवात केली. त्यातून सपनाला खूप प्रसिद्धी मिळाली. आज ती शो आणि गाण्यांच्या कमाईतून कोट्यधीश झाली आहे. सपना चौधरी सध्या ५० कोटींच्या संपत्तीची मालक आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला. असं म्हटलं जातं की, सपना चौधरीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला स्टेज शोसाठी फक्त ३१०० रुपये मिळत होते. पण हळूहळू डान्समुळे तिची फॅन फॉलोइंग वाढत गेली. यासोबतच त्यांची स्टेज शोचं मानधनही वाढत गेलं. आज सपना चौधरी स्टेज शो करण्यासाठी २५-५० लाख रुपयांचं मानधन घेते.