छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'चा सहावा सीजन ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. करण जोहरने सहाव्या सिझनसाठी चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे. करणनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून सगळ्यांना याविषयी सांगितले आहे. करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच सैफ अली खान आणि सारा अली खान यांचा फोटो पोस्ट करून आज कॉफी विथ करणसाठी मी चित्रीकरण केले असे सांगितले आहे. सैफ अली खान आणि सारा अली खान यांच्यासोबत चित्रीकरण करायला मजा आली. वडील आणि मुलीच्या या जोडीने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
करणने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर सारा अली खानने देखील लगेचच कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि माझ्या पहिल्या कॉफीसाठी धऩ्यवाद असे लिहिले आहे.
सारा अली खान सिम्बा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सारा ही अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मोठी मुलगी आहे. ती करण जोहरच्याच धर्मा प्रोडक्शद्वारे बॉलिवूडमधील तिच्या करियरला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग तिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
साराची कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकण्याची पहिलीच वेळ असली तरी सैफ या कार्यक्रमात पाचव्या वेळेस उपस्थित राहाणार आहे. तो याआधी या कार्यक्रमात प्रीती झिंटा, सोहा अली खान, करिना कपूर आणि कंगना रणौतसोबत झळकला होता.
'कॉफी विथ करण' सहाव्या सीझनचे पहिले गेस्ट अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट असणार आहेत. करण जोहरनेच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. 'कॉफीचा पहिला कप गर्ल पॉवरसोबत. दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट तुमचे स्वागत आहे सहाव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये.''
'कॉफी विथ करण'चा हा सिझनदेखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.