‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) ही गोष्ट आहे दोन सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुलीसोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी'.
सारं काही तिच्यासाठी या मालिकेत उमाची भूमिका अभिनेत्री खुशबू तावडे हिने साकारली आहे. या मालिकेबद्दल ती म्हणाली की, मी या मालिकेत उमाची भूमिका साकारणार आहे. उमा तिच्या लहान बहिणीपासून काही वर्षापूर्वी दुरावलेली आहे. हीच उमा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जाते. उमा खूप सुस्वभावी, शांत आणि कुटुंबात सगळ्यांची काळजी घेणारी आहे. कुटुंबात सर्वांच्या अडीअडचणी तिला माहिती आहेत पण एवढं असूनही तिला तिच्या लहान बहिणीला भेटण्याची इच्छा ती व्यक्त करू शकत नाही. असं काय घडलय ज्यामुळे या दोन बहिणींमध्ये दुरावा आला. ही मालिका प्रेक्षकांसाठी नक्कीच जिज्ञासा निर्माण करेल आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल.
ती पुढे म्हणाली की, मी आधीदेखील मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. पण जेव्हा मला एखादी भूमिका मिळते तेव्हा त्या भूमिकेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्याला मालिकेत मुख्य भूमिका मिळते तेव्हा आपण मालिकेत केंद्रबिंदू असतो. मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली ती देखील झी मराठी कडून त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि कोणताही विचार न करता मी या मालिकेसाठी होकार दिला. मी ही कथा ऐकली तेव्हा मला ती खूप रंजक वाटली कारण ह्या मालिकेत दोन बहिणीचं नातं दाखवलं आहे. ह्या सगळ्यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी सख्खी बहीण तितिक्षा सुद्धा झी मराठीवर सातव्या मुलीची सातवी मुलगी ह्या मालिकेमध्ये काम करत आहे. आमच्या कुटुंबासाठी ही फारच आनंदाची गोष्ट आहे.दोन बहिणींची अनोखी कथा सारं काही तिच्यासाठी २१ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला मिळेल.