छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'साराभाई वर्सेज साराभाई'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता राजेश कुमार (Rajesh Kumar). छोट्या पडद्यावर राजेशने त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच त्याने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आणि शेट शेती व्यवसायाकडे वळला.
अलिकडेच राजेश कुमार याने 'जॉइन फिल्म्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या शेती व्यवसायातील काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. "२०१७ मध्ये टिव्ही इंडस्ट्रीमध्ये मी यशाच्या शिखरावर होतो. त्याचवेळी मी शेती करण्याचा निर्णय घेतला. टीव्ही मालिकांमध्ये काम करत असताना मला आनंद मिळत होता. पण, या क्षेत्राशिवाय मी माझ्या पुढच्या पिढीसाठी काय करतोय हा विचार सतत माझ्या डोक्यात घोळत असायचा," असं राजेश कुमार म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर मी शेतकरी म्हणून काम करु लागलो. यावेळी स्वत:च्या पिकांची काळजी घेणं, इतर शेतकऱ्यांना शिक्षित करणं, त्यांच्या विकासात मदत करणं, ही सगळं आव्हानं पेलली. त्याचवेळी माध्यमांनी माझ्या दिवाळखोरीच्या बातम्या दिल्या. शेती करण्याचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला माझं खूप नुकसान झालं, अनेक अडचणी आल्या मी कर्जबाजारी झालो. त्यात करोना आला. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. ही पाच वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेली. पण मी थांबलो नाही. या काळात माझ्या शिक्षणाने मला प्रेरणा दिली आणि मी कठीण मात करत मला मार्ग सापडला.
दरम्यान, राजेश कुमार सोशल मीडियावर सक्रीय असून तो कायम त्याच्या शेतातील फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतो. 'मेरा फॅमिली फार्मर' याच्या माध्यमातून तो लोकांना पूर्णपणे नैसर्गिक रसायनमुक्त धान्य, भाज्यांची विक्री करतो. त्यामुळे अभिनयासह तो आता शेती व्यवसाय सुद्धा करतो.