'साराभाई वर्सेस साराभाई 2' या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगडमध्ये असलेले तिचे कुटुंबीय मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या निधनाची बातमी तीन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता वैभवीचा मृत्यू झाला आहे. टीव्ही इंडस्ट्रीने तीन दिवसांत दोन दिग्गज कलाकार गमावले. निधनाबद्दल चाहत्यांनी शोकही व्यक्त केला आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2' मध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेते जेडी मजेठिया यांनी तिच्या मृत्यूची माहिती दिली केली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जेडी यांनी खुलासा केला आहे की, वळण घेत असताना वैभवीची कार दरीत कोसळली. कारमध्ये वैभवीचा होणारा नवरा देखील होता. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे. जेडी मजेठिया यांनी वैभवीच्या मृत्यूबाबत तिच्या भावाशी संवाद साधला. जेडी यांनी हे "अविश्वसनीय, दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांचा यावर विश्वास बसत नाही. जीवनाची शाश्वती नाही" असं म्हटलं आहे.
वैभवी उपाध्याय टीव्ही शो 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2', 'क्या कसूर है अमला का', वेब सीरिज 'प्लीज फाइंड अटॅच्ड' आणि 'छपाक' चित्रपटातही दिसली होती. वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.