Mugdha Vaishampayan Frist Ganesh Chaturthi :'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे मराठी कलाविश्वातील सर्वात गोड कपल आहे. मुग्धा-प्रथमेशने आपल्या सुरांच्या जादूने प्रेक्षकांना मोहिनी घातली. गेल्यावर्षीच डिसेंबर २०२३ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर या दोघांची कायमच चर्चा रंगताना दिसते. अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवातील काही खास फोटो इंटरनेटवर शेअर केले आहेत.
दरम्यान, गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. खासकरून सोशल मीडियावरही प्रत्येक जण गणरायांप्रती असलेला भावभक्तीचा जागर करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाच्या पोस्ट, फोटो, सजावट यांची एकच क्लिक-क्लिक सुरू आहे. त्यातच मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यंदा मुग्धा-प्रथमेशने त्यांचा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव कोकणात साजरा केला आहे. रत्नागिरीतील अरवली हे त्याचं गाव आहे. तिथे अगदी पारंपरिक पद्धतीने लघाटेंच्या घरी बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. पती प्रथमेश लघाटेसोबत काही खास फोटो क्लिक करत मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
"रंभ तूच यशकीर्तीचा जीवनी गणेशा,दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा,तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी!!" असं कॅप्शन देत लग्नानंतरचा पहिल्या गणेशोत्सवाचे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
मराठी संगीत विश्वातील हे जोडपं कायमच मराठी संस्कृतीला जपतात याची प्रचिती सोशल मीडियाच्या माध्यमातून येते. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मुग्धा अलिबागची असून प्रथमेश रत्नागिरीचा आहे. दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत. कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा स्वभाव चाहत्यांच्याही खूप पसंतीस पडतो.