कोरोना महामारीमुळे अनेकांनी जीव गमावले़ हजारो हात बेरोजगार झालेत. टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. बडे स्टार्स सोडले तर या इंडस्ट्रीवर अवलंबून असलेले अनेक छोटे कलाकार, टेक्निशिअन्स यांच्या हाताचे काम थांबले. टीव्ही अभिनेत्री विभा भगत (Vibha Bhagat) यापैकीच एक. गेल्या दोन वर्षांत तिला अतिशय कठीण स्थितीतून जावे लागले.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने आपबीती सांगितली. ‘ससुराल सीमर का 2’ (Sasural Simar Ka 2 )या मालिकेत काम मिळण्यापूर्वीचे दिवस आठवत तिने सांगितले, पर्सनली व प्रोफेशनली गेली दोन वर्षे माझ्यासाठी अतिशय खडतर राहिलीत. मी माझ्या वडिलांना गमावले़ माझ्याकडे काम नव्हते. आर्थिक संकटामुळे मी कोलमडले होते. मानसिकदृष्ट्या पार खचले होते. अगदी एकवेळ उपाशी राहण्याची वेळही माझ्यावर आली. बिस्किट वा एखादे फळ काढून मी कसेबसे दिवस काढलेत. पण मी कुणालाच सांगू शकत नव्हते. कलाकार कधीच याबद्दल बोलू शकत नाही. कारण त्यांनी स्वत: हे आयुष्य निवडलेले असते. 2 वर्षानंतर मला ‘ससुराल सिमर का 2’ या मालिकेत काम मिळाले, असे तिने सांगितले.
मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, पण याऊपरही मला काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, याची खंत आजही वाटते. या इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागलेत, अजूनही करतेय, असेही ती म्हणाली.गेल्या दोन वर्षांत मी खूप काही शिकले. अनेकदा निराश झाले. पण पुन्हा स्वत:ला सावरले. स्वत:वर लक्ष केंद्रीत केले. वर्कआऊट, पेन्टिंग बनवणे, मेडिटेशन यात वेळ घालवला. माझ्या मित्रांनी मला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास खूप मदत केली. त्यांनी मला प्रोत्साहन दिले, असेही तिने सांगितले.