Join us

'साथ निभाना साथिया'च्या सेटवर अहमने गोपी बहूला दिल्या होत्या शिव्या, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 5:25 PM

"मी शिव्या दिल्यानंतर आम्ही...", 'साथ निभाना साथिया'च्या सेटवर झालं होतं गोपी बहू आणि अहमचं भांडण

'साथ निभाना साथिया' ही टीव्हीवरील लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेली मालिका. या मालिकेतील गोपी बहूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सुरू होताच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल होती. मालिकेतील गोपी बहू आणि अहमची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. या मालिकेत अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने गोपी बहूची भूमिका साकारली होती. गोपी बहू या पात्राने तिला प्रसिद्धीझोतात आणलं होतं. तर अभिनेता मोहम्मद नाजिम अहमच्या भूमिकेत होता. 

ऑनस्क्रीन एकत्र दिसणारे गोपी बहू आणि अहमच्या भूमिकेतील देवोलिना आणि मोहम्मद मात्र ऑफस्क्रीन किती तरी महिने एकमेकांशी बोलत नव्हते. त्यांच्यात मोठं भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांच्या मैत्रीतही दुरावा आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोहम्मदने याचा खुलासा केला. यावेळी त्याने भांडणात देवोलिनाला सेटवरच शिवीगाळ केल्याचंही कबुल केलं. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद म्हणाला, "रिहर्सल करताना आमच्यात काहीतरी भांडण झालं. तेव्हा मी तिला अपशब्द वापरत शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर आम्ही ७-८ महिने एकमेकांशी बोललो नव्हतो. पण, आम्ही सीन्स चांगले करत होतो. दुसऱ्यापेक्षा चांगलं काम करायच्या नादात आमच्याकडून खरंच चांगलं काम होत होतं." 

पुढे तो म्हणाला, "हे भांडण नव्हतं तर हा फक्त गर्व होता. एक दिवस शूट करताना आम्ही या भांडणाला असंच हसण्यावारी घेत ते संपवून टाकलं. तेव्हा आम्हाला हेदेखील आठवत नव्हतं की आम्ही कधी भांडलो होतो". 

'साथ निभाना साथिया' मालिकेने तब्बल सात वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. स्टार प्लसवरील या मालिकेतील कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली. २०१० मध्ये ही मालिका सुरू झाली होती. सुरुवातीला अभिनेत्री जिया मनेक गोपी बहूची भूमिका साकारायची. पण, तिने मध्येच मालिका सोडल्यानंतर यात देवोलिनाची एन्ट्री झाली. २०१७ साली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत विशाल सिंह, ऋचा हसबनीस, अमर उपाध्याय, रुपल पटेल यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्लससेलिब्रिटी